ऐन उन्हाळ्यात चंद्रभागेत भाविकांचे नौकानयन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पंढरपूर - ऐन कडक उन्हाळ्यात चंद्रभागेमध्ये पाणी उपलब्ध असल्याने भाविक नौकानयनाचा आनंद लुटत असल्याचे विहंगम चित्र पाहावयास मिळत आहे.

पंढरपूर - ऐन कडक उन्हाळ्यात चंद्रभागेमध्ये पाणी उपलब्ध असल्याने भाविक नौकानयनाचा आनंद लुटत असल्याचे विहंगम चित्र पाहावयास मिळत आहे.

शनिवार ते मंगळवार अशा सलग चार दिवस सुट्यांमुळे नोकरदार वर्गासह बहुसंख्य लोक तीर्थाटनासाठी बाहेर पडले आहेत. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज (रविवारी) शहरातील विविध मठ, हॉटेल आणि लॉज भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. भाविकांची संख्या वाढल्याने विठ्ठल दर्शनाची रांग दर्शनमंडप भरून पुढे गेली होती. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना उन्हाचा त्रास होत आहे. त्यामुळे चंद्रभागेकाठी स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यातच अनेक जण नौकानयनाचादेखील मनसोक्त आनंद लुटत आहेत. गेल्या काही महिन्यांनंतर उन्हाळ्यात प्रथमच नदीपात्रात पाणी आल्याने होडीचालकांतून  समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे येथील कोळी समाजबांधवांनी होड्यांची संख्यादेखील वाढवली आहे. तुडुंब भरलेले नदीपात्र पाहून भाविकांना नौकानयनाचा मोह आवरता येत नाही. 

१५० अधिक होड्या
येथील नदीपात्रात सुमारे १५० हून अधिक होड्या आहेत. या व्यवसायावर सुमारे २०० ते २५० कुटुंबाची गुजराण होते. या काळात भाविक नौकानयन करीत असल्याने होडीचालकांनाही रोजगार मिळाला आहे. नदीपात्रात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने भाविकांबरोबरच होडीचालकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. 

नौकानयनासाठी भाविकांची मागणी वाढली आहे. येथे जवळपास १५० होड्या आहेत. मागील काही दिवसांपासून होडी व्यवसायावर संकट आले आहे. नदीपात्रात पाणी उपलब्ध असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुट्यांमुळे व्यवसाय वाढला आहे. किमान २५० ते ३०० रुपये मिळतात.
- दत्ता कोरे,  होडीचालक, पंढरपूर

Web Title: Devotees in Chandrabhaga river during summer in pandharpur