कऱ्हाड उत्तरेतील शक्तिप्रदर्शन... काँग्रेसचे की धैर्यशील कदमांचे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कऱ्हाड - वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष व कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचा मसूर येथे झालेल्या सत्कार व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेचे ठरले आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसअंतर्गत वादाने हे शक्तिप्रदर्शन अधिक लक्षवेधी बनले असताना अनेक वक्‍त्यांनी आमदार आनंदराव पाटील यांना लक्ष्य करत टीकेची झोडही उठवली. मात्र, पक्षांतर्गत धुसफुशीनंतर कालच्या कार्यक्रमात झालेले शक्तिप्रदर्शन नेमके काँग्रेसचे की धैर्यशील कदम यांचे, याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे. 

कऱ्हाड - वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष व कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचा मसूर येथे झालेल्या सत्कार व शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेचे ठरले आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसअंतर्गत वादाने हे शक्तिप्रदर्शन अधिक लक्षवेधी बनले असताना अनेक वक्‍त्यांनी आमदार आनंदराव पाटील यांना लक्ष्य करत टीकेची झोडही उठवली. मात्र, पक्षांतर्गत धुसफुशीनंतर कालच्या कार्यक्रमात झालेले शक्तिप्रदर्शन नेमके काँग्रेसचे की धैर्यशील कदम यांचे, याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे. 

वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग कारखान्याची उभारणी व अमेरिकेचा अभ्यास दौरा पूर्ण केल्याबद्दल कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्या सत्काराचा कार्यक्रम अगोदरपासून चर्चेत आला. या कार्यक्रमाच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कदम यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले.

मात्र, दोन्ही काँग्रसेची आघाडी झाल्यास कऱ्हाड उत्तरेतील काँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीचा विचार करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी श्री. कदम यांनी केली. त्याचवेळी ‘बॅलेट पेपर’वर धैर्यशील कदम हे नाव असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री. कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यातून काँग्रेसअंतर्गत दोन्ही गटांचा वाद चव्हाट्यावर आला. श्री. कदम यांनीही आमदार पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. मात्र, तत्पूर्वीच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा दूरध्वनी आल्याने श्री. कदम यांनी तलवार म्यान केली. त्यामुळे मसूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागून होते. श्री. कदम यांनीही विरोधकांसह स्वपक्षीय विरोधकांना शक्तिप्रदर्शन करत उत्तरेतील ताकद दाखवून दिली. त्यात जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्याशी मतभेद असलेले आमदार गोरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असल्याने हा कार्यक्रम रंगतदार होणार, हे निश्‍चित होते. झालेही तसेच. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवल्यावर आमदार गोरे, श्री. कदम यांनीही जिल्हाध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत खरपूस समाचार घेतला. आमदार गोरे यांच्याकडून सातत्याने ‘उंची’चे माप काढण्यावर भर राहिल्याने कार्यकर्त्यांचेही मनोरंजन झाले. मात्र, आमदार गोरे यांनी आघाडीची वाट न पाहता तयारी सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपानंतर कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादीच्या वाट्यास गेल्यास श्री. कदम यांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागणार आहे.   

अंतर्गत वादावर पडदा?
आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार आनंदराव पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी केलेल्या टीका टिप्पणीचा खरपूस समाचारही घेतला. मात्र शेवटी ‘नाना व आम्ही एकच आहोत,’ असे माध्यमांना सांगून नाना जे बोलले, ते वडीलकीच्या नात्याने बोलले असे सांगून आम्ही काँग्रेसचेच पाईक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदार गोरे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसअंतर्गत वादावर लवकर पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: dhairyashil kadam congress power presentation politics