धनंजय महाडिकांचे ठरलं; ‘ताराराणी’ सह युवाशक्तीही होणार भाजपमध्ये विसर्जित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या वृत्ताला दुजोरा देत गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या वृत्ताला दुजोरा देत गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

श्री. महाडिक यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. श्री. महाडिक यांच्यासोबत काही जिल्हा परिषद सदस्य, महापालिकेतील नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात ५० जणांचा ५ सप्टेंबरला प्रवेश होईल. त्यात त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती, मुलगा व युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमानंतर कोल्हापुरात होणाऱ्या भव्य मेळाव्यात इतरांचे प्रवेश होणार आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर श्री. महाडिक यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. या प्रवेशावेळीच श्री. महाडिक यांचे नेतृत्व असलेली ताराराणी आघाडी व धनंजय महाडिक युवाशक्तीचे विसर्जनही भाजपात होणार असून, तशी अटच श्री. महाडिक यांना घातल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्री. महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार होते; पण सुरवातीपासूनच त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विरोध होता. मुंबईत तिकीट वाटपाच्या पार्श्‍वभूमीवर बोलवलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच काहींनी उघडपणे श्री. महाडिक यांना विरोध केला. दुसरीकडे श्री. महाडिक यांनीही राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ नये, असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांसह नातेवाइकांचे मत होते. तथापि श्री. पवार यांच्यावरील प्रेम व निष्ठेपोटी श्री. महाडिक यांनी उमेदवारी स्वीकारली; पण त्यांना दोन्ही काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांनीच धोका दिला आणि त्यातून त्यांचा मोठा पराभव झाला. 

लोकसभेतील पराभवानंतर श्री. महाडिक हे पक्षापासून दूर आहेत. पक्षाध्यक्ष पवार यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यात ते सहभागी झाले होते, पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर ते दिसलेले नाहीत. जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर ते नाराज आहेत. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात यापूर्वी त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. या भेटीत कधी आणि कोठे भाजप प्रवेश करायचा एवढीच औपचारिकता शिल्लक होती. सुरवातीला सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीतच आपला प्रवेश होण्यासाठी श्री. महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्या कार्यक्रमात हा प्रवेश होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यानंतर आज ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश निश्‍चित करण्यात आला.

होय, माझं ठरलंय - महाडिक
यासंदर्भात श्री. महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपला भाजप प्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबर रोजी तो होणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पक्षाची जबाबदारी मिळणारे एकमेव
यापूर्वी ज्यांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना महामंडळ, मंत्रिमंडळ किंवा अन्य ठिकाणी पदे देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. महाडिक हे एकमेव राष्ट्रवादीतून भाजपत जाणारे नेते आहेत की त्यांच्यावर भाजप पक्षाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. लवकरच त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली जाणार आहे. त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे छत्रपती, विधान परिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह यांचाही प्रवेश होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Mahadik entry in BJP on 5 September