पवारसाहेबांवर बोलता, फडणवीस तुमचे वय काय?: धनंजय मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

शरद पवारांविषयी बोलताना फडणवीसांनी मर्यादा बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दिल्लीतून रिंगमास्टर (अमित शाह) आल्याने त्यांना खूश करण्यासाठी फडणवीसांना केवळ जनावरे दिसत होती, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई : मुख्यमंत्री महोदय जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. तुमचे गुरू आमच्या गुरूचे बोट पकडून राजकारणात आले आहेत हे बहुदा तुम्ही विसरलात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय ? कर्तृत्व काय ? शरद पवार साहेबांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोलापूमध्ये तोफ डागली. 

मुंबईतील कालच्या भाजप महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य केले होते. फडणवीसांबरोबरच भाजपचे आणखी एक वजनदार मंत्री चंद्रकांतदादा यांनी तर अजित पवारांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध राष्ट्रवादीचा सामना पाहण्यास मिळत आहे. राज्यात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेने भाजपचे नेते संतप्त झाले आहेत. या यात्रेदरम्यान अजित पवारांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच शरद पवारांनीही भाजपला लक्ष्य केले आहे. यासर्व घडामोडी लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांना चहावाल्याच्या नादी लागू नका असा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाला राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत मुख्यमंत्र्यांचा समाजार घेतला. 

ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांसारख्या नेत्यांवर सांभाळून बोलले पाहिजे. पवारसाहेबांसमोर फडणवीसांचे कर्तृत्व काय ? अमित शहा यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पवारसाहेबांवर टीका केली. साहेबांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही ?'' 

शरद पवारांविषयी बोलताना फडणवीसांनी मर्यादा बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला. दिल्लीतून रिंगमास्टर (अमित शाह) आल्याने त्यांना खूश करण्यासाठी फडणवीसांना केवळ जनावरे दिसत होती, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Dhananjay Munde criticize Devendra Fadnavis in hallabol yatra