धनगर आरक्षणावरून अण्णा डांगेंचा सरकारला इशारा 

अजित झळके
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत निघाली आहे. काही दिवसांत सरकारला काम करणे अवघड होईल, अशी परिस्थिती निर्माण करू, असा इशारा धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिला. 

सांगली - राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आम्ही चार वर्षे वाट पाहिली. आता अंत पाहू नये. धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत निघाली आहे. काही दिवसांत सरकारला काम करणे अवघड होईल, अशी परिस्थिती निर्माण करू, असा इशारा धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिला. 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धनगर समाजाने धरणे आंदोलन केले. आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाभरात अनेक ठिकाणी ठिय्या, रास्तारोको, मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर श्री. डांगे यांनी धनगर समाजाने घेतलेली सबुरीची भूमिका आणि आता चवताळून उठलेला तरूण, याकडे लक्ष वेधले. 

ते म्हणाले, ""भाजपचे सरकार अवघ्या 122 आमदारांसह आले आहे. बहुमतासाठी त्यांच्याकडे 22 जागा कमी आहेत. शिवसेनेच्या टेकूवर सरकार चालले आहे. शिवसेना कशी वागते, साऱ्यांना माहिती आहे. अशावेळी धनगर समाजाला आरक्षण द्याल तर आम्ही पाठींबा काढून घेऊ, असा इशारा आदिवासी समाजातील आमदारांनी दिला आहे. आता आमच्या आरक्षणासाठी भाजप सरकार पाडून घेईल, असे वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही चार वर्षे सबुरीने घेतले. आता शेवट आला आहे. एक वर्षात हा विषय मिटला नाही तर सरकारने आमची फसवणूक केली हे स्पष्ट होईल. त्यामुळे जे काही असेल तर आताच, अशी भूमिका घेऊन समाज रस्त्यावर उतरला आहे. सरकारची अपरिहार्यता आम्ही समजून घेतली, आता अंत पाहू नये.'' 

धोका विसरू नका 
अण्णा डांगे म्हणाले, ""भाजप सरकारविरुद्ध समाजातील सर्वच घटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सांगली महापालिका निवडणूकीत लॉटरी लागली म्हणून सगळीकडे लागेल असे नाही. जीएसटी असेल, नोटबंदी असेल सर्वच पातळीवर तीव्र संताप आहे. त्यामुळे भाजपला आरक्षणाच्या प्रश्‍नातील नाराजी धोकादायक ठरेल. त्यांना हा धोका विसरू नये.'' 

Web Title: Dhangar Reservation Anna Dange comment