धनगर आरक्षणाचा लवकरच निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेला मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या कामांचे उद्‌घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे अध्यक्षस्थानी होते. आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख उपस्थित होते. पंढरपूर रस्त्यावर मेंढे मळ्यात वारकरी भवन, शिवाजी क्रीडांगण सुधारणा या कामाचा प्रारंभ झाला. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयातील लढाईवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. सर्वोत्तम वकील दिलेत. पंधरा दिवसांनी सुनावणी आहे. निश्‍चित चांगला निर्णय होईल. राज्यात साठ ते सत्तर लाख मराठ्यांनी हिंसाचार न करता मोर्चे काढले. त्यांना फडणवीस सरकारने न्याय दिला. मागास आयोग नेमला. ४५ हजार घरांत ४० पानी प्रश्न विचारून सर्वेक्षण केले.

हा अहवाल न्यायालयाने जसाच्या तसा स्वीकारला. मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न अयशस्वी झाला. आता मराठ्यांनी मुख्यमंत्र्यांना लाखोंच्या संख्येने पत्रे, संदेश पाठवून धन्यवाद दिले पाहिजेत. धनगर समाजालाही निश्‍चित आरक्षण मिळेल. आदिवासींच्या आरक्षणाला तसूभरही धक्का लागणार नाही. धनगर नेत्यांनी अभ्यासपूर्वक भाषणे करावीत. हिंदूंना फोडण्याचा प्रयत्न होतोय. तो यशस्वी होता कामा नये.’’

ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या शंभर कोटींतून शहरांचा कायापालट होईल. महापालिकेच्या वाट्याचे तीस कोटी द्यावे लागणार नाहीत. सुधीर गाडगीळ यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे महापालिकेत सत्ता मिळाली. सरकारकडे पैशांची कमी नाही. जीएसटीतून ३३ हजार कोटी मिळाले. त्यातील दहा हजार कोटींतून २८ हजार 
गावांतील दुष्काळावर उपाययोजना केल्या.’’ 

मंत्री खाडे म्हणाले, ‘‘६८ वर्ष मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या मिरज तालुक्‍याला पक्षाने न्याय दिला. मिरजेला भरभरून निधी देईन. प्रस्ताव द्यावेत.

महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नगरसेवक सुरेश आवटी, गायत्री कुल्लोळी, ऊर्मिला बेलवलकर, युवराज बावडेकर, निरंजन आवटी, श्रीकांत शिंदे, गजेंद्र कुल्लोळी, दिगंबर जाधव, मुन्ना कुरणे आदी यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar reservation decision soon