धनगर समाजाचे आरक्षणासाठी मिरजेत चक्काजाम आंदोलन 

संतोष भिसे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मिरज - धनगर व धनगड ही एकच जात असल्याने राज्य शासनाने धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर बांधवांनी आंदोलन केले. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिध्देवाडी खण ( ता. मिरज ) फाट्यावर समाजाने आज चक्का जाम आंदोलन केले.

मिरज - धनगर व धनगड ही एकच जात असल्याने राज्य शासनाने धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर बांधवांनी आंदोलन केले. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सिध्देवाडी खण ( ता. मिरज ) फाट्यावर समाजाने आज चक्का जाम आंदोलन केले. एक तास झालेल्या आंदोलनाने वाहतुक ठप्प झाली होती.

शासनाने आरक्षणासाठी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा नेते जयसिंग शेंडगे यांनी दिला. श्री. शेंडगे म्हणाले, राज्यात धनगड समाज अस्तित्वात नाही. धनगड आणि धनगर यात असल्याने चुकीच्या नोंदीची दुरूस्ती करून धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीचे आरक्षणाची अंमलबाजवणी करून तसे दाखले देण्याची तातडीने व्यवस्था करावी.

धनगड व धनगर ही वेगवेगळी जात असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी आदिवासीमंत्री विष्णु सावरा यांच्यावर कारवाई करावी.

- दादासाहेब धडस, आहिल्यादेवी प्रतिष्ठान प्रमुख

सिध्देवाडी येथील बाळूमामा मंदिर परिसरातील आहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.

राज्यातील तत्कालीन आघाडी शासनाने आरक्षणासाठी धनगर समाजाला झुलवत ठेवण्याचे काम केले. आरक्षणाची अंमलबाजावणी करण्याच्या आश्वासनावर धनगर समाज सध्याच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या पाठीशी राहिल. मात्र युती शासन सत्तेवर आल्यानंतर वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याने न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. आमच्या सहनशिलतेचा अंत न पहात आरक्षणाची अंमलबाजवणी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

- जयसिंग शेंडगे

गुंडेवाडीचे माजी सरपंच आनंदा गडदे, माजी उपसरपंच आनंदा खोत यांनीही अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलजावणी न केल्यास टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तिव्रता वाढवावी लागेल असा इशारा दिला. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्‍यात एकही धनगड नसल्याचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. सरपंच रामचंद्र वाघमोडे, सोनीचे सुरेश नरूटे, गुंडेवाडीचे सरपंच भाऊसो पाटील, प्रकाश इनामदार, नेताजी खोत, बंडू धडस, नारायण धडस, अमर नानगुरे, संभाजी देवकाते यांच्यासह धनगर बांधव सहभागी होते.

मिरज पंचायत समितीचे सदस्य कृष्णा कांबळे, भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेश सचिव राजाराम गेजगे, रिपाईचे प्रकाश इनामदार व गुरव समाजातर्फे शामराव गुरव यांनी पाठिंबा दिला. 

Web Title: Dhangar Samaj agitation in Miraj