धटिंग कंपनीचा ‘जॉब है की नही’ होतोय लोकप्रिय

धटिंग कंपनीचा ‘जॉब है की नही’ होतोय लोकप्रिय

सोलापूरच्या तरुणांची वेब सिरीज; नोकरी शोधणाऱ्यांच्या मानसिकतेवर भाष्य

सोलापूर - अलीकडे वेब सिरीज हा प्रकार लोकप्रिय होतोय. सोलापुरातल्या काही तरुणांनीही एकत्र येत द धटिंग कंपनी या नावाने यू ट्यूबवर वेब सिरीज बनवली आहे. त्याअंतर्गत नोकरी मिळवू पाहणाऱ्या उमेदवारांच्या मानसिकतेवर बनविलेला ‘जॉब है की नही...’ हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय. ड्रॅमॅटिक पद्धतीने रिॲलिटी मांडण्याचं या धटिंग तरुणांचं स्वप्न आहे.

रोहित जाधव, विशाल सरडे आणि रॉबर्ट गाऊडर यांनी द धटिंग कंपनी या नावाने यू ट्यूबवर स्वत:चं चॅनेल सुरू केलंय. रोहित हा टेक्‍निकल ट्रेनर, विशाल हा ग्राफिक्‍स डिझाइनर तर रॉबर्ट हा सॉफ्ट स्किल ट्रेन म्हणून काम करतो. वेब सिरीज पाहण्याचं वेड असणाऱ्या सोलापूरच्या या तिघा युवकांनी स्वत:चं एक वेब सिरीज बनविण्याचा ध्यास घेतला. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांना येणारे अनुभव हा विषय त्यांनी निवडला. 
टू फेस्ड इंटरव्ह्यू नावाचा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो १७ जुलै २०१६ रोजी यू ट्यूबवर अपलोड केला. उमेदवारांना इंटरव्ह्यूदरम्यान अनेक प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांचं उमेदवाराच्या मनात खरं तर वेगळंच उत्तर असतं, पण प्रत्यक्षात मात्र तो पाठ केलेली उत्तरं देतो. ही वस्तुस्थिती टू फेस्ड इंटरव्ह्यूमधून मांडण्यात आलीय.

या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर द धटिंग कंपनीनं २९ जुलै २०१६ रोजी चार मिनिटांचा ‘जॉब है की नही...’ हा व्हिडिओ अपलोड केला. इंटरव्ह्यूला सामोरं गेल्यानंतर सिलेक्‍शन झाल्याचा कॉल येईपर्यंत उमेदवाराची मानसिकता कशी असते, हे त्यातून मांडण्यात आलंय. मध्यंतरी आलेल्या ‘रॉय’ या बॉलिवूडपटातील ‘तू है की नही’ हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. रोहितनं या गाण्याचे शब्द बदलत त्याचं जॉब है की नही... असं केलं. 

धटिंग कंपनीच्या वेब सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओही यू ट्यूब पाहणाऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. या वेब सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, ॲक्‍टिंग या सर्व गोष्टी या तिघांनीच केल्या आहेत. यू ट्यूबवर द धटिंग कंपनी असं सर्च करून हे व्हिडिओ पाहता येतील.

वेब सिरीज बनवणं अवघड नाही. चित्रीकरणासाठी आम्ही मुद्दाम मोबाईल कॅमेऱ्याचा वापर केला. आपापल्या क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या पाच मित्रांची कहाणी हा धटिंग कंपनीच्या वेब सिरीजचा पुढचा विषय असेल. कॉमन मॅनला त्रासदायक ठरणाऱ्या प्रश्‍नांवरही आम्ही काम करू.
- रोहित जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com