महिंद धरणाच्या सांडव्यावरून पाणी

महिंद धरणाच्या सांडव्यावरून पाणी

ढेबेवाडी -परिसरात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयातील आवक टिकून राहिल्याने आज महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या काही वर्षांपासून सांडव्याकडील भितींच्या पडझडीने धरणातील सुमारे ३० टक्के पाणी वाया जात होते. मात्र, अलीकडेच सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम पूर्ण झाल्याने ही गळती थांबली आहे. उन्हाळ्यातील टंचाई काळात नदीकाठच्या गावांना चांगला फायदा होणार आहे.

वांग नदीवरील महिंद धरणाची घळभरणी २००० मध्ये पूर्ण झाली. बनपुरीपर्यंत धरणाचे लाभक्षेत्र असले तरी त्यापुढीलही अनेक गावांनाही धरणातील पाण्याचा उपयोग होतो. ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणाऱ्या या धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटर, तर बुडीत क्षेत्र ३७.३४ हेक्‍टर आहे. नदीकाठचे ३६२ क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ४८४ मीटरच्या मातीच्या धरणाला १०४ मीटरचा मुक्तपतन पद्धतीचा सांडवा असून अलीकडे त्याची दुरवस्था झाल्याने धरण फुटण्याची भीती  होती. 

पावसाळा तोंडावर असताना पाटबंधारे विभागाने सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम हाती घेतले. अधीक्षक अभियंता विजय घोगरेंच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बोडके, सहायक कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे यांनी ठेकेदार महेश पाटील यांच्या माध्यमातून ते यशस्वीपणे पूर्णही केले. या बांधकामानंतर आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 

गाळाची डोकेदुखी कायमच...
महिंद धरणात बांधकामापासून साचलेला गाळ हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. आमदार शंभूराज देसाई, आमदार नरेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर गाळ उपसण्यास मुहूर्त मिळाला. एक मे रोजी या कामास प्रारंभही झाला. मात्र, शेतकऱ्यांकडून गाळ नेण्यास प्रतिसाद मिळाला नाही. ७० हजार घनमीटर गाळापैकी गेल्या दोन महिन्यांत अत्यल्प गाळाचाच उपसा झाला असून आता पुन्हा हा गाळ पाण्याखाली गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com