ब्रिटिशकालीन पोलिस चौकीला घरघर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

ढेबेवाडी - अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या मालदन (ता. पाटण) येथील ब्रिटिशकालीन पोलिस चौकीची अनेक वर्षांपासून देखभालच झाली नसल्याने लवकरच तिचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ढेबेवाडी - अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या मालदन (ता. पाटण) येथील ब्रिटिशकालीन पोलिस चौकीची अनेक वर्षांपासून देखभालच झाली नसल्याने लवकरच तिचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्रिटिश राजवटीत कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर येथील वांग नदीवर पूल तयार होण्यापूर्वी ढेबेवाडी बाजारपेठेचे महत्त्व फारसे वाढले नव्हते. सुविधांपासून वंचित छोट्या वाडीचेच स्वरूप होते. त्यावेळी विभागावर नियंत्रणासाठी मालदन येथे पोलिस चौकी होती. त्या अंतर्गत परिसरातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांचा समावेश होता. तक्रारदाराला पोलिसांकडे दाद मागण्यासाठी मालदनला जावे लागत होते. दगडी बांधकामाच्या पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी तिथे नेमणुकीला असायचे. अनेक ऐतिहासिक घटना व प्रसंगांची साक्षीदार असलेली ही पोलिस चौकी अनेक वर्षे मालदनमध्ये सुरू होती. ढेबेवाडीजवळ नदीवर पूल झाल्यानंतर येथील बाजारपेठ हळूहळू विकसित झाली. ढेबेवाडी हेच विभागाचे मध्यवर्ती केंद्र बनल्याने विविध कार्यालये येथे सुरू झाली. त्यामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याचाही समावेश होता. ते सुरू झाल्यानंतर मालदनची पोलिस चौकी बंद करण्यात आली. गावाबाहेर एका बाजूला असलेल्या चौकीची सुरवातीला काही वर्षे देखभालही सुरू होती. ग्रामस्थांकडून सार्वजनिक कामांसाठी त्याचा वापरही केला जाई. मात्र, कालांतराने देखभाल व वापर थांबून चौकीच्या दुर्दशेला सुरवात झाली. अजूनही ती सुरूच असून मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने आणि लाकडांसह बरेच साहित्य गायब झाल्याने या ब्रिटिशकालीन ठेव्याचे उरले-सुरले अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे.

केवळ अक्षम्य दुर्लक्षामुळेच!
पोलिस चौकीची इमारत गवत आणि झुडपांनी वेढली असून भिंतीतून झाडे उगवली आहेत. एकेकाळी पोलिस आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची वर्दळ असलेले हे ठिकाण सध्या उंदीर, घुशी, साप आणि मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे. केवळ दुर्लक्षामुळेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठेवा डोळ्यासमोरच नष्ट होत असल्याने परिसरातील नागरिकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा ठेवा जतन करण्यासाठी पोलिस खात्याने पुढाकार घेऊन हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: dhebewadi satara news British police post