पाणीसाठ्यासाठी रहाटालाच कुलूप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

ढेबेवाडी - डोंगरमाथ्यावरील आंब्रुळकरवाडी (ता. पाटण) येथे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावालगतच्या सार्वजनिक विहिरीत तीन दिवस पाणी साठविल्यानंतर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला कसेतरी दोन- तीन घागरी पाणीच येत आहे. हे छोटेसे गाव प्रतिवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी सोसत असलेल्या यातना कायमस्वरूपी संपविण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.

भोसगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ५०० लोकवस्तीची आंब्रुळकरवाडी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईशी सामना करीत आहे. गावातील अनेक जण नोकरी व व्यवसायानिमित्ताने मुंबईसह अन्य शहरात स्थायिक झाले असून, गावातील पाण्यासाठीची वणवण डोळ्यासमोर असल्याने उन्हाळ्यात सुटीलाही ते गावी येणे टाळत आहेत. डोंगर पायथ्याला मराठवाडी धरणाचा तुडूंब भरलेला जलाशय असला, तरी डोंगरावरून खाली तो डोळ्यांनी पाहण्याशिवाय ग्रामस्थांसमोर दुसरा पर्यायच नाही. 

नळांना फक्त एक दोन घागरीच पाणी मिळत असल्याने डोक्‍यावर हंडे घेऊन रानावनातील झरे शोधत महिला व पुरुषांसह छोट्या मुलांचीही अक्षरशः वणवण सुरू आहे. गावालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे. विहिरीतील स्त्रोत मंदावल्यामुळे पाणी साठल्यानंतर तीन दिवसांनी त्यातून उपसा केला जात आहे. उपसा बंदच्या काळात कुणी पाणी नेऊ नये म्हणून रहाटाला कुलूप घातले जात आहे, तरीही त्यातून प्रत्येक कुटुंबाला दोन घागरी पाणी मिळत आहे.

पाण्याचे स्रोत बळकट करण्याची गरज
आंब्रुळकरवाडीत अनेक वर्षांपासून जनता टंचाईच्या झळा भोगत असली, तरी ठोस उपाय मात्र तिथे राबविलेले दिसत नाहीत. टंचाई काळात केवळ टॅंकर सुरू करणे हा तात्पुरता दिलासा असला, तरी त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे. डोंगर पायथ्यावरून दोन- तीन टप्प्यांत माथ्यावर पाणी पोचवून नळ योजना कायमस्वरूपी कार्यान्वित करणे शक्‍य आहे का याचाही अभ्यास होण्याची आवश्‍यकता आहे. लोकप्रतिनिधींनी त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Web Title: dhebewadi satara news water storage issue