धुळे: पंचायतराज समितीने घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 6 जुलै 2017

येथील ग्रामस्थांच्या विविध अडचणी समजावून घेत आज पंचायतराज समितीने समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामस्थांसमोरच झाडाझडती घेतली. समितीने मराठी शाळेला भेट देऊन तेथील शौचालय, पोषण आहार, परिसर आणि गुणवत्तेचीही तपासणी केली.

कापडणे (जि. धुळे) - येथील ग्रामस्थांच्या विविध अडचणी समजावून घेत आज पंचायतराज समितीने समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामस्थांसमोरच झाडाझडती घेतली. समितीने मराठी शाळेला भेट देऊन तेथील शौचालय, पोषण आहार, परिसर आणि गुणवत्तेचीही तपासणी केली.

आज सकाळी अकरा वाजता पंचायतराज समिती सदस्य गावामध्ये दाखल झाले. ग्रामस्थांनी ढोल ताश्‍यांच्या गजरात तर विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून समितीचे स्वागत केले. आमदार तटकरे, आमदार हेमंत पाटील, आमदार विकास कुंभारे, सचिव सावकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी आदींचा समावेश होता. यावेळी शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, मुख्य अभियंता सोनवणे, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी यावेळी समितीसमोर विविध अडचणी मांडल्या. पाणी पुरवठा योजनेतील त्रूटी, अशुद्ध पाणीपुरवठा, गावठाणच्या जमिनीचा विषय, पैसे देऊनही शोषखड्ड्यांचा अभाव, ग्रामसभेसाठीची अपुरी जागा निधीचा वानवा आदी समस्या ग्रामस्थांनी पंचायतराज समितीपुढे मांडल्या. यासंदर्भात समितीने ग्रामस्थांसमोरच अधिकाऱ्यांची हजेरी घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन महिन्यात हागणदारीमुक्त?
समितीने शौचालय योजनेचा आढावा घेतला. हागणदारीमुक्तीच्या बाबतीत गाव बरेच मागे असल्याचे लक्षात आले. याबाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी यांनी अवघ्या दोन महिन्यात शंभर टक्के शौचालयांचे लाभार्थी आणि हागणदारीमुक्त गाव होईल, असा शब्द समितीला दिला. त्यानंतर समितीने ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी केली. यावेळी आदेशवजा काही सुचनाही केल्यात.

पाणी पुरवठा योजनेचे पुन्हा चौकशी
भाजपाचे बापू खलाणे, ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील, राजेंद्र माळी, किशोर पाटील यांनी समितीसमोर तीन कोटी बारा लाखाच्या सोनवद पाणी पुरवठा योजनेविषयी तक्रारींचा पाढा वाचला. अशुद्ध पाण्याचा नमुनाही दाखविला. समितीने अधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत चौकशीचे आदेश दिले.

मॅडन ज्ञानेश्वरची स्पेलिंग लिहा
समितीने येथील शाळा क्रमांक एक व दोनमधील गुणवत्ता पडताळून बघितली. शिक्षिकेस ज्ञानेश्वरची स्पेलिंगही लिहायला लावली. विद्यार्थीनींनी दिलेल्या उत्तराने समितीही भारावली. शाळेतील शौचालयात पाण्याच्या उपलब्धतेच्या सूचना केल्यात. पोषण आहारातील घटक चव घेवून चाचपडून बघितले. शाळा गळती व घसगुंडीच्या दुरुस्तीचेही आदेश दिलेत.

Web Title: dhule news kapadne news panchayatraj samiti marathi news sakal news

फोटो गॅलरी