विषमता हेच लोकशाहीसमोरील आव्हान - जयराम रमेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - 'सुपर पॉवर इंडिया', "डेव्हलप कंट्री' यावर वारेमाप चर्चा होत असली, तरी वाढत चाललेली विषमता हेच लोकशाहीसमोरील मोठे आव्हान ठरणार असल्याचे परखड मत माजी केंद्रीय मंत्री, विचारवंत आणि खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार लिखित "धुमाळी' (करंट-अंडरकरंट) आणि त्यांनी संपादित केलेल्या "संवाद क्रांती' या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात होते.

"सकाळ प्रकाशना'तर्फे ही दोन्ही पुस्तके प्रकाशित झाली. राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी हाउसफुल्ल गर्दी केली होती. कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांची प्रमुख उपस्थिती होती.

"भारतीय राजकारणाची वाटचाल - जागतिक दृष्टिकोनातून' या विषयावर जयराम रमेश यांनी तीस मिनिटांचा संवाद साधला. मात्र, त्यात त्यांनी अतिशय समर्पक शब्दांत सध्याची राजकीय वाटचाल आणि लोकशाही टिकवण्यासाठी नेमके काय करायला हवे, या विषयी मंथन घडवून आणले. ते म्हणाले, 'लोकशाही असो किंवा राजकारण सारेच भरभरून बोलतात. पण, दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सहनशक्ती संपते की काय, असे सध्याचे चित्र आहे. विविधतेने नटलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. विविधतेतून एकता हेच देशाचे बलस्थान आहे. त्या विविधतेचा सन्मानच केला पाहिजे आणि प्रत्येक घटकाला समाजात बरोबरीचे स्थान मिळेल, याचा विश्‍वास दिला गेला पाहिजे.'' गेल्या पंचवीस वर्षात आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्रांती झाली, हे मान्य असले तरी विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भविष्यात लोकशाही संपुष्टात येण्याची लक्षणे असून राष्ट्रीय धोरण म्हणूनच आता हा विषय अजेंड्यावर घेण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात जयराम रमेश यांच्या संवादातीलच तीन मुद्‌द्‌यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ""देशातील काही विद्यापीठात विद्यार्थ्यांना भाषणे करू दिली जात नाहीत. कारण विरोधी मते एकून घेण्याची सहनशक्तीच संपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे समाजातील सर्व घटकांना बरोबरीचे स्थान देणारे होते आणि मी आयुष्यभर चांगला भारतीयच बनेन, ही शिकवण आपण विसरल्याचे ते लक्षण आहे.''
शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ""जागतिकीकरणाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना धुमाळी (करंट-अंडरकरंट) हे पुस्तक समाजासमोर आले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यातला समाजातील सर्वच घटकांचा संघर्ष आणि देशातील असो किंवा जगातील बदलत्या राजकारणातील विविध पदर श्रीराम पवार यांनी अगदी अभ्यासपूर्ण मांडले आहेत.''

मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, '2014 च्या निवडणुकीनंतरची बदललेली सत्ता, त्यातून पुढे आलेल्या प्रतिमानिर्मिती, प्रतिमाभंजन या संकल्पना आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राजकारणाचा बदललेला पोत, त्यातील विविध अंतर्प्रवाह आणि त्याचे भविष्यात होणारे परिणाम "करंट-अंडरकरंट'मधून सर्वांसमोर आणले. बदलत्या तंत्रज्ञानावर समाजातील प्रत्येक घटकाला स्वार होता आले पाहिजे, यासाठी "संवाद क्रांती' विशेषांकातील निवडक लेखांचा संग्रह सकाळ प्रकाशनाने वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही पुस्तकांना निश्‍चित मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' "सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी आभार मानले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

संवाद हाच आत्मा
भारत-चीन युद्धावेळी पस्तीस वर्षीय संसदसदस्य अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत याविषयी काहीच चर्चा होत नसल्याचे एक पत्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिले. त्यानंतर तीन तासांतच त्याबाबतचा निर्णय होऊन पुढे आठवडाभर संसेदत चर्चा चालली होती, हा संसदेचा इतिहास आहे. मुळात निवडणूक, पक्ष, संसद ही लोकशाहीची आपल्याला बाहेरून दिसणारी प्रतीके असली, तरी वाद-प्रतिवाद आणि एकूणच संवाद हा लोकशाहीचा खरा आत्मा असल्याची गोष्ट पुन्हा समजून सांगण्याची वेळ आली असल्याचे जयराम रमेश म्हणाले.

कोल्हापूरचा अभिमान
श्रीराम पवार यांच्या पत्रकारितेविषयी गौरवोद्‌गार काढताना डॉ. थोरात म्हणाले, 'झपाटून काम करताना वास्तवावर निर्भयपणे प्रहार करतानाही तितक्‍याच समतोलपणे लिखाण करण्याचा आदर्श पवार यांनी घालून दिला आहे. कोल्हापुरात अशा पत्रकार, संपादकांची टीम अजूनही खमकेपणाने कार्यरत असल्याने कोल्हापूरच्या लोकशाहीला अजूनही धोका नाही. ही मंडळी कोल्हापूरचा अभिमान आहेत.''

राजकारणाचे ग्रामर
धुमाळी (करंट-अंडरकरंट) हे पुस्तक प्रत्येक घटकाला नवी दृष्टी देणारे आहे. समाज बदलण्याची इच्छा असणारे किंवा राजकारणात काही नवं करू पाहणाऱ्यांसाठी ते नक्कीच प्रेरणा देणारे किंबहुना "राजकारणाचं ग्रामर' म्हणूनच ते सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. प्रकाश पवार यांनी सांगितले.

Web Title: dhumali & sanwad kranti book publication