सोलापूर - सिव्हिलमध्ये आता माफक दरात डायलेसिस उपचार 

hospital
hospital

सोलापूर : प्रिसिजन आणि वैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन डायलेसिस युनिट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी सात युनिट आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहेत. त्या युनिटचा लोकार्पण सोहळा 27 जूनला सकाळी 9.30 वाजता डॉ. तात्याराव लहाने, प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा, डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल रुग्णालयातील "ए' ब्लॉकमध्ये होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिव्हिल रुग्णालयात सध्या सोलापूरसह आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील हजारो डायलेसिस (किडनी आजार) रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. त्यांना आता या डायलेसिस युनिटमुळे माफक दरात उपचार मिळतील, असे डॉ. घाटे यांनी सांगितले. या वेळी डॉ. प्रमोद कुलकर्णी, डॉ. एन. सी. प्रसाद, डॉ. सुहासिनी शहा आदी उपस्थित होते. 

सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या सुमारे 150 पदे रिक्‍त असून अर्थसाहाय्य अपुरे पडते. त्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने एक लाख रुपये, सेवानिवृत्त कर्मचारी आर. एम. कुलकर्णी यांनी 25 हजार रुपये, डायलेसिस युनिटच्या परिचर्या विभागाकडून एक लाख 31 हजार रुपये, वरिष्ठ लिपिक राहुल बनसोडे 11 हजार रुपये, औषध निर्मात्या सुश्‍मिता कटकधोंड यांनी पाच हजार तर केतन निसार यांनी 25 हजार आणि मेडिसीन विभागाकडून तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. आता बॅंकांसह पंढरपूर, अक्‍कलकोट आणि शिर्डी देवस्थानलाही अर्थसाहाय्याबाबत पत्र दिले आहे. 
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

डायलेसिसची वैशिष्ट्ये -
- सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत रुग्णांवर होणार उपचार 
- किडनीला गंभीर इजा व किडनीचा जुनाट रोग असलेल्यांना प्राधान्य 
- सहा वर्षांवरील बालरुग्णांची जबाबदारी बालरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक यांच्याकडे 
- बाह्यरुग्णांसाठी दर बुधवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत होणार उपचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com