शरद पवार लढल्यास शिंदे यांच्यापुढे अडचण

शरद पवार लढल्यास शिंदे यांच्यापुढे अडचण

करमाळा -  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार हेच निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ते कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले. आता त्यांना खाली का बसवताय? मोहिते-पाटील यांच्यावर कुरघोडीचा डाव होतोय का? असे मेसेज सोशल मीडियातून फिरत आहेत. यातून मोहिते-पाटील समर्थकांची नाराजी दिसून येते आहे. शिवसेना आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या रश्‍मी बागल हे विधानसभेसाठी तयारीत आहेत. या तिघांबरोबरच माजी आमदार जयवंतराव जगताप यांचीही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. रश्‍मी बागल या शरद पवार यांच्या विश्‍वासू मानल्या जातात. 

मागच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधातील सदाभाऊ खोत यांना करमाळ्याने मताधिक्‍य दिले होते. त्या वेळी आमदार नारायण पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा प्रचार केला. नंतर मात्र त्यांचे मोहिते-पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध झाले. २०१४ च्या विधानसभेपासून मोहिते-पाटील समर्थक आमदार नारायण पाटील यांच्या बरोबर होते. त्यामुळे जर मोहिते-पाटील उमेदवार असतील तर पाटील समर्थक हे मोहिते-पाटील यांच्या पारड्यात आपले माप टाकतील. जर मोहिते-पाटील उमेदवार नसतील तर मात्र युतीच्या उमेदवाराचा प्रचार आमदार नारायण पाटील हे करतील. मागील आठवड्यात इंदापूर (पुणे) येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आमदार नारायण पाटील यांच्या कामाचे कौतुक केल्याचीही चर्चा आहे. 

करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी मोहिते-पाटील लोकसभेला असतील तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार रिंगणात उतरणार असल्याने संजय शिंदे आता कोणाचा प्रचार करणार? भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस याविषयी चर्चा सुरू आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यांनी मागील चार महिन्यांत अनेक वेळा करमाळा दौरे केले, मात्र शरद पवार यांच्या उमेदवारीने त्यांचे नाव मागे पडले आहे. 

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी यशवंत परिवाराच्या वतीने खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करून मोहिते-पाटील, बागल यांना एकसंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ३१ डिसेंबर रोजी निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी मोहिते-पाटील हे आमदार नारायण पाटील यांना मदत करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे बागल-मोहिते-पाटील यांच्यातील मतभेद दिसून आले. त्यामुळे चर्चेला वाव मिळाला आहे. 

महत्त्वाचे ठरणारे मुद्दे 
  खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना डावलले जात असल्याने मोहिते-पाटील समर्थकांत नाराजी 
  विजयसिंह यांनी निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा आग्रह
  संजय शिंदे कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता 
  भाजपची उमेदवारी कोणाला? याची उत्सुकता
  शिवसेना आमदार नारायण पाटील व मोहिते-पाटील यांच्यात सलोख्याचे संबंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com