कॅशलेसला सकारात्मकता कौतुकास्पद 

कॅशलेसला सकारात्मकता कौतुकास्पद 

कोल्हापूर - सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या डिजिधन मेळाव्याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. कॅशलेस पद्धतीला प्रतिसाद देऊन कोल्हापूरवासीयांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे गौरवोद्‌गार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे काढले. 

कॅशलेस व्यवहाराबाबत जागरुकता व डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने महासैनिक दरबार हॉलमध्ये आज डिजिधन मेळाव्याचे उद्‌घाटन झाले, या वेळी ते बोलत होते. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

श्री. भामरे म्हणाले, ""भाजपने 2014 मध्येच डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे. देशातील 1 टक्के लोकच इन्कमटॅक्‍स भरत आहेत. उर्वरित लोक विविध कारणांनी कर चुकवेगिरी करतात. त्यामुळे डिजिटल आणि ऑनलाइनसह कॅशलेस प्रणालीमुळे उर्वरित लोकांनाही प्रामाणिकपणे कर भरावा लागणार आहे. याचा सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. देशात 100 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याचा मान कोल्हापूरला मिळाला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. रोखरहित समाज या संकल्पनेची माहिती देणे हाच या डिजिधन मेळाव्याचा हेतू आहे. मेळाव्यात बॅंकांसह खाऊच्या, बचत गटांच्या स्टॉलवरही कॅशलेस व्यवहार केले जात आहेत. अन्य शासकीय कार्यालयांचे सुमारे 100 स्टॉल लावले आहेत. देशात पारदर्शी कारभार व्हावा यासाठी नोटाबंदी जाहीर केली. जग बदलत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहे. हाच बदल आता देशातील प्रत्येक नागरिकाने स्वीकारला पाहिजे. जिल्ह्यातील लोक सकारात्मक विचाराचे आहेत. त्यांनी हा बदल स्वीकारला आहे. कोणताही विकास करताना त्रास होणारच; पण केवळ विरोध करायचा म्हणून टीका करायची, या वृत्तीला कोल्हापूरकरांनी बगल देऊन कॅशलेसकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.'' 

सदाभाऊ खोत म्हणाले, ""कॅशलेस प्रणाली सर्वोत्तम प्रणाली आहे. शासनाने रोखरहित संकल्पना अवलंबली आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर जास्तीत जास्त लोक कॅशलेस व्यवहार कसा करतील किंवा तो कसा करावा, याबाबत माहिती डिजिधन मेळाव्यात दिली जाणार आहे. कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना देण्यासाठी कॅशलेस व्यवहार फायद्याचे ठरणार आहेत.'' 

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ""सुरक्षित कॅशलेस व्यवहार कसा करावा, याची योग्य आणि निर्दोष माहिती देणे हाच या मेळाव्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील जनधनमधून 7 लाखांहून अधिक खाती काढली आहेत. यापैकी 6 लाख खातेदारांचे आधार नंबर जोडले आहेत. 6 लाख लोकांना रुपेकार्ड दिले आहे. जिल्हा डिजिटलमय होत आहे.'' 

या वेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसीना फरास, माहिती तंत्रज्ञानचे संचालक एम. जे. मुजाउद्दीन, एमपीसीएचे महेंद्र जोशी, निती आयोगाचे संचालक अनिल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आयुक्त पी. शिवशंकर, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे उपस्थित होते. 

पथनाट्ये सादर 
डिजिधन मेळाव्यात डिजिधन, मुद्रा बॅंक, बेटी बचाओ बेटी पढाओ, महा अवयवदान अशा विविध विषयांवर पथनाट्ये सादर केली. याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

सहभाग 
डिजिधन मेळाव्यामध्ये विविध बॅंका, ऑइल व गॅस कंपन्या, चेंबर ऑफ कॉमर्स, विविध दूध संघ, उद्योग संघटना, महसूल विभाग यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. 

डिजिटल गाव 
हणबरवाडी (ता. कागल) आणि नागाव (ता. करवीर) या दोन गावांत डिजिटल व्यवहार होत आहेत. त्यामुळे या गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा धागा पकडून डॉ. भामरे म्हणाले, ""कोल्हापुरातील गावेही डिजिटल होत आहेत. ही बाब अनुकरणीय आहे.'' 

सेलिब्रेटींचा सत्कार 
डिजिधनमध्ये सेलिब्रेटी म्हणून उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, नेमबाज राधिका बराले, जितेंद्र विभूते आणि अनुष्का पाटील यांचा सत्कार झाला. 

लकी ड्रॉ काढणार 
देशस्तरावरील लकी ग्राहक योजना व डिजिधन व्यापारांतर्गत ड्रॉ काढण्यात येणार आहे. यामध्ये 9 लाख 80 हजार बक्षिसांचे वितरण केले जाईल. 9 लाख 20 हजार ग्राहक तर 56 हजार व्यावसायिकांचा समावेश असणार आहे, असेही संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com