काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदाराला लॉटरी; मिळणार 'ही' जबाबदारी?

तात्या लांडगे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

- दिलीप मानेंना मिळणार संपर्कप्रमुखपद
- शिवसेना प्रवेशावेळी मोठी गर्दी 
- सावंतांना प्रचारासाठी मिळणार मोकळीक 

सोलापूर : कॉंग्रेसचे माजी दिलीप माने यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. काही दिवसांपूर्वी करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्‍मी बागल यांनी काही मोजक्‍या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. माने यांनी मात्र, एसटी गाड्यांसह अन्य वाहनांमधून असंख्य कार्यकर्ते घेऊन जाऊन शिवसेनेत प्रवेश करीत आपली ताकद दाखवून दिली. अक्षरश: बाहेर स्टेज मारुन त्यांना प्रवेश द्यावा लागला. या पार्श्‍वभूमीवर आता त्यांना जिल्ह्यातील मोठी जबाबदारी मिळेल, असा विश्‍वास शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. 

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सध्या सोलापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद, सोलापूर व उस्मानाबादचे संपर्कप्रमुखपदही आहे. दरम्यान, त्यांनी सोलापूर, उस्मानाबादसह राज्यातील 50 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यादृष्टीने त्यांनी काही नेत्यांना शिवसेनेतही घेतल्याचे उदाहरण दिलीप माने व रश्‍मी बागल यांच्या रुपाने पहायला मिळाले. मात्र, करमाळ्यात रश्‍मी बागल यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे आव्हान आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी त्याची जाणीवही शिवसेना पक्षप्रमुखांना झाली.

दिलीप माने यांच्या प्रवेशावेळी मात्र, उपस्थित कार्यकर्ते पाहून ठाकरे यांना माने यांची ताकद पहायला मिळाली. त्यामुळे सावंत यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अधिकाधिक आमदार विजयी व्हावेत, यादृष्टीने सर्वत्र फिरता यावे या उद्देशाने सोलापूरचे संपर्कप्रमुखपद माने यांच्याकडे सोपविले जाईल, अशी चर्चा आहे.
 
कार्यकर्ते दक्षिणचे मात्र उमेदवारीसाठी मध्यवर डोळा 
कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप माने यांनी प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांची मते जाणून, त्यांना विश्‍वासात घेऊन कॉंग्रेसमधील घुसमट सांगितली. कॉंग्रेसमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची एकाधिकारशाही अन्‌ जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष, निधी मागणी करुनही आमदार निधी मिळत नसल्याचे दु:ख, या पार्श्‍वभूमीवर आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याची चर्चा आहे.

युती झाल्यास दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सहकारमंत्री सुभाष देशमुख भाजपचे उमेदवार असतील तर युती न झाल्यास तेथून गणेश वानकर आणि शहर मध्यमधून दिलीप माने यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळे कॉंग्रेस सोडली त्यांच्याविरोधात माने यांची लढत होईल, अशी शक्‍यताही व्यक्‍त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip mane may appointed as shivsena Contatct leader