दिलीप माने म्हणाले.. सोलापूर ही कोणाची जहागीरदारी नाही! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मेरे अंगणे में तुम्हारा क्‍या काम है? या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्‍नावर माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी उत्तर दिले. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पहिले अंगण हे करमाळा आहे. दुसरे अंगण उत्तर सोलापूर होते, त्यानंतर ते दक्षिण सोलापूरमध्ये आले. आता त्यांची कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्यच्या आमदार आहेत.

सोलापूर - मेरे अंगणे में तुम्हारा क्‍या काम है? या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्‍नावर माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी उत्तर दिले. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पहिले अंगण हे करमाळा आहे. दुसरे अंगण उत्तर सोलापूर होते, त्यानंतर ते दक्षिण सोलापूरमध्ये आले. आता त्यांची कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्यच्या आमदार आहेत. शिंदे यांच्या अंगणाचा शोध घ्यावा लागेल असे सांगताना सोलापूर ही कोणाची जहागीरदारी नाही असे माने यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार माने हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. ते म्हणाले, "लोकशाहीत कोणतेही क्षेत्र, मतदार संघ कोणाचे नाही. धर्मण्णा सादूल, एस.आर.दमाणी, गंगाधरपंत कुचन, सुभाष देशमुख, शरद बनसोडे सोलापूरचे खासदार होते, या नेत्यांनी कधीही सोलापूर हे माझे अंगण आहे असे म्हटले नाही. सादूल यांची उमेदवारी कोणी रद्द केली आणि तेव्हा खासदार कोण झाले हे सोलापूरकरांना माहिती आहे. शहर मध्य मतदार संघातून नरसय्या आडम मास्तर, प्रकाश यलगुलवार, शिवशरण पाटील हे आमदार झाले आहेत. सोलापूर हे चार हुतात्म्यांचे अंगण आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडून लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.' 

गेल्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदार संघात भाजपच्या उमेदवार मोहिनी पतकी आणि शिवसेना उमेदवार महेश कोठे यांना मिळालेली युतीची मते यावेळेस मला मिळणे अपेक्षित होते, पण तसे झाले दिसत नाही. ज्यांनी माझ्यासाठी काम केले नाही, दगाफटका केला त्यांचा अहवाल शिवसेना आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देणार आहे असे सांगताना माजी आमदार दिलीप माने यांनी आता महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. पुढच्या वेळी कोणावर अवलंबून न राहता शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

श्री. माने म्हणाले, "महेश कोठे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे. शिवसेनेत असताना ते भाजपच्या संपर्कातही होते. युती तुटल्यास भाजपातून निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी होती. त्यांची ही दुहेरी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यापर्यंत पोचली होती. स्थानिक शिवसेना नेत्यांनी याबाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांच्याविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.' 

शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत, समन्वयक शिवाजी सावंत त्यांच्यावर झालेले आरोप चुकीचे आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, साखर कारखाने आहेत. त्यांच्यावर आरोप करताना विचार केला पाहिजे. मलाही कॉंग्रेसमध्ये असताना अनेकदा उमेदवारी मिळाली नाही, मी कधीही द्वेषातून आरोप केले नाहीत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि काही नगरसेवकांनी माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र काही नगरसेवकांनी मला मदत केली नाही. याबाबत मी भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना अहवाल देणार आहे, असेही माने यांनी सांगितले. 

"एमआयएमला कॉंग्रेसनेच मोठे केले आहे. मी सोलापूर दक्षिण मतदार संघात असतो तर.. हा जर-तरचा विषय आहे. दिलीप माने कधी संपणार नाही. यापूर्वी मी कधी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नाही, आता मात्र मला लक्ष द्यावे लागणार आहे, असेही माने यांनी यावेळी सांगितले. 

महेश कोठे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. मी आता महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होणार असून माझा पराभव झाला असला तरी मी शहर मध्य मतदार संघात सातत्याने काम करत राहणार आहे. 
- दिलीप माने, माजी आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Mane Talking Politics Solapur