चर्चा दिलीपतात्यांना मारलेल्या विरोधकांच्या मिठीची

शांताराम पाटील
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

इस्लामपूर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील अध्यक्ष बदलासाठीच्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर दिलीप पाटील यांचा वाढदिवस यंदा अधिक चर्चेचा  ठरला. यानिमित्ताने त्यांच्या सर्वपक्षीय मित्र परिवार आणि जयंत पाटील विरोधकांनी त्यांना मारलेल्या मिठीचे तालुक्‍यात अर्थ अन्वयार्थ काढले जात आहेत. दिलीपतात्यांच्या समर्थकांमध्ये या मिठीची ‘समझने वालोंको इशारा काफी है’, अशी चर्चा आहे. 

राजारामबापूंच्या मुशीत जनता पक्षापासून कार्यरत असणाऱ्या दिलीपतात्यांची मला वकुबाप्रमाणे राजकीय संधी मिळाली नाही अशी नेहमीची तक्रार आहे. बापूंच्या नेतृत्वाखाली कारखान्यात ते सर्वात कमी वयाचे  संचालक होते. तेव्हापासून ते स्वतःला बापूंचे निष्ठावान कार्यकर्ते समजतात. पुढे त्यांनी जयंत पाटील यांना नेते मानून राजकीय वाटचाल करताना संधी मिळेल तेव्हा आपले ज्येष्ठत्व सतत जाणवून दिले आहे.

जयंतरावांनी त्यांच्याकडे सूतगिरणी सोपवली. वस्त्रोद्योग संकुलानंतर त्यांचे पुनर्वसन जयंतरावांनी जिल्हा बॅंकेत केले. तिथेही त्यांनी आपल्या शिस्तीचा बडगा दाखवत खाक्‍या दाखवला. आता तिथे संचालक मंडळी वेगवेगळ्या कारणांनी दुखावली आहेत. त्यांनी ते परदेशी असताना इकडे अध्यक्ष बदलाला गती दिली. रविवारी ते इस्लामपुरात परतले. ते काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी टाळले. जयंतराव सांगतील तेव्हा राजीनामा असा त्यांनी आपला पवित्रा जाहीर केला आहे. 

मात्र विरोधकांनी त्यांचा वाढदिवस आणि अध्यक्ष बदलाच्या हालचालीचा योग साधत जयंतरावांवर कडी केली आहे. राष्ट्रवादीच्या नियमित पदाधिकाऱ्यांबरोबरच त्यांच्या वाढदिवसासाठी अभिष्टचिंतन करण्यासाठी  आलेले मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, निशिकांत पाटील अशा अनेकांची उपस्थिती सर्वांसाठी अधिक राजकीय चर्चेची होती. जणू त्यांची शुभेच्छांसाठी चढाओढच सुरू होती. सर्वपक्षीय मैत्रीच्या उधाणाचा अर्थ आता जयंतरावांनी योग्य तो लावावा, असा संदेशच जणू यानिमित्ताने तात्यांच्या समर्थकांनी दिला.

Web Title: Dilip patil Sadabhau Khot Politics