सोलापूर : दिलीप सोपलांना प्रशासक देणार धक्‍का

तात्या लांडगे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीचे प्रशासक कोथमिरे यांनी केले नियोजन

सोलापूर : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा बॅंकेने शंभर वर्षांचा काळ पूर्ण केला. मात्र, बिगरशेती संस्थांकडील वसूल न होणाऱ्या थकबाकीमुळे बँक अडचणीत सापडली. बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित विजय शुगरचा (करकंब, ता. पंढरपूर) 125 कोटीला विकला. तर आता माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगरचा ताबा घेऊन त्याचा मालमत्तेसह लिलाव करण्याचे नियोजन प्रशासकांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बिगरशेती संस्था विशेषत: साखर कारखान्यांकडील दीड हजार कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा बॅंकेचे शेती कर्जवाटप आठ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे बळीराजाला राष्ट्रीयीकृत बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दुसरीकडे सततचा दुष्काळ अन्‌ नैसर्गिक आपत्तींमुळे व रखडलेल्या कर्जमाफीमुळे शेती कर्जाची वसुली ठप्प आहे. यामुळे बाराशेपैकी आठशे विकास सोसायट्या अनिष्ठ तफावतीत आहेत. त्यातून बॅंकेला बाहेर काढण्यासाठी प्रशासक कोथमिरे यांनी ओटीएस (एकरकमी परतफेड योजना) सुरु केले. त्यामध्येही सहभाग न घेतलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे नियोजनही प्रशासकांनी केले आहे.

विजय शुगर कारखान्याच्या लिलावापूर्वी बॅंकेने लागू केलेल्या ओटीएस योजनेत त्यांनी सहभाग घेतलाच नाही. शेवटी प्रशासकांनी कारखान्याचा लिलाव केला. आता आर्यन शुगरचा ताबा बँकेने घेतला आहे. मात्र, बॅंकेच्या थकबाकीएवढी रक्‍कम त्यातून मिळणार नाही. त्यामुळे प्रशासकांनी अनोखी शक्‍कल लढवीत कायदेशीररित्या थकबाकीची पूर्ण रक्‍कम वसूल होईल, असे नियोजन केल्याची चर्चा आहे.

शंकर, स्वामी समर्थ अन्‌ सांगोला कारखान्यांचाही ताबा 

शंकर साखर कारखाना, अक्‍कलकोटचा स्वामी समर्थ साखर कारखाना व सांगोल्यातील सांगोला साखर कारखान्यावर जिल्हा बॅंकेसह राज्य बॅंकेचेही कर्ज आहे. राज्य बॅंक लिड बॅंक असल्याने जिल्हा बॅंकेला थेट कर्ज वसुली करता येत नाही. त्यामुळे प्रशासकांनी आता राज्य बॅंकेशी पत्रव्यवहार केला असून, त्यातून मार्ग काढत या कारखान्यांचाही लिलाव करण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांत यावर निर्णय अपेक्षित असून त्यातून मिळणाऱ्या रकमेतून बॅंकेची स्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Sopal may in Difficulties