मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली; "झेडपी'च्या शाळा खासगी कार्यक्रमासाठी

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली; "झेडपी'च्या शाळा खासगी कार्यक्रमासाठी
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या शाळांची मागील वर्षी चांगली रंगरंगोटी झाली आहे. अनेक शाळा "आयएसओ' झाल्या आहेत. त्यामुळे या शाळा खासगी कार्यक्रमाला देऊ नयेत, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिले होते. मात्र, त्या आदेशाला मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे खासगी कार्यक्रमाला शाळा उपलब्ध करून देणाऱ्या मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा "आयएसओ' करण्यासाठी 11 कोटी रुपये लोकवर्गणी जमा झाली होती. त्या माध्यमातून शाळांचे रुपडे पालटले होते. त्याचवेळी या शाळा वेगवेगळ्या खासगी कार्यक्रमाला देण्यात येऊ नये, असे निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शिक्षण समिती सभापतीसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याचवेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अनेक तालुक्‍यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्राची दखलच घेतली नसल्याचे सत्य समोर येत आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकाराखाली या लग्नकार्याला दिल्या आहेत. मुख्याध्यापकांनी अनधिकृतपणे हे धाडस केले आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगूनही लग्नकार्यासाठी शाळा दिल्या आहेत. त्यामुळे त्या मुख्याध्यापकांनी केलेले हे कृत्य प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे मत शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी व्यक्त केले आहे. अशाप्रकारे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या मुख्याध्यापकांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र मुख्याध्यापकांना दिले नाही, त्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. शाळांचे विद्रुपीकरण रोखण्याचे आदेश देऊनही त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
 

शाळा व्यवस्थापन समितीला सांगा
जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याही खासगी कार्यक्रमाला द्यायच्या नाहीत, असे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीला सांगणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: disciplinary action will be taken against the headmasters