डिस्काऊंट योजनेतून कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तासगाव - सुलभ हप्त्यावर भव्य डिस्काऊंट योजनेच्या गोंडस नावाखाली प्रत्येकी आठ हजार रुपये गोळा करून तासगावातील एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. यामध्ये सुमारे दोन हजार जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. फसवणूक झालेल्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्‍यातील लोकांकडून या कंपनीने वस्तू देण्यासाठी पैसे गोळा केले आहेत. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

याबाबाबत अधिक माहिती अशी - वासुंबे (ता. तासगाव) येथील एका कंपनीने एक आकर्षक भूलभुलय्या जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये बोलेरो जीप आणि कुबोटा ट्रॅक्‍टरसह मोटारसायकली, फ्रिज, मोबाईल, आटाचक्‍की, एलईडी टीव्ही, पाच ग्रॅमचे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडरसह शेगडी, वॉटरकुलर, लोखंडी कपाटे, वॉटरप्युरिफायर अशा एक ना अनेक वस्तू ४९९ चे पाच हप्ते आणि ८९९ चे सहा हप्ते भरून मिळवा. २४९९ सभासद आणि २४९९ बक्षिसे! दरमहा एक बक्षिसाची सोडत अशी जाहिरात केली.  शहरात एका खोलीत कार्यालय थाटले. ग्रामीण भागात या योजनेसाठी महिला-मुलींनी फिरून सभासद गोळा केले. सुरुवातीला एप्रिल २०१८ पासून दरमहाच्या सोडतीही पार पडल्या; पण विजेत्यांना सर्वात शेवटी सर्व हप्ते पूर्ण झाल्यावर वस्तू देण्याची हमी देण्यात आली. सोमवारी (ता. २७) या योजनेचा शेवटचा दिवस आणि शेवटची सोडत होती. त्याप्रमाणे एका मंगल कार्यालयात आणि या कंपनीच्या कार्यालयात सर्वजण गोळा झाले; पण कार्यालयाला कुलूप आणि मंगल कार्यालयातही कंपनीचे कोणी नाही म्हटल्यावर पैसे गुंतवणारे सभासद अक्षरशः हादरले. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी फसवणूक झालेल्यांशी चर्चा करून तक्रार देण्याची सूचना केली. त्यावरून उपस्थितांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जावर ८० हून अधिकजणांची नावे आहेत. यापैकी प्रत्येकाने सात ते आठ हजार रुपये हप्त्याने दिले आहेत.

सर्वजण नॉटरिचेबल
दुर्दैवाने कंपनीमधील कोणीही फसवणूक झालेल्यांच्या ओळखीचे नाही. त्यांचे नाव आणि गावही माहिती नाही. संपर्कासाठी दिलेले मोबाईल क्रमांक सध्या नॉटरिचेबल लागत आहेत. योजनेत काही जणांनी कुटुंबातील सर्वांना सभासद करून योजनेत सहभाग घेतला आहे. फसवणूक झालेले बहुतांशी हातावर पोट असणारे आहेत. योजनेत तासगाव, पलूस, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील अनेकांची फसवणूक झाल्याची शक्‍यता आहे.

Web Title: Discount Scheme Cheating Crime