esakal | Good News:लग्नसमारंभांसाठी या आठवड्यात सूट

बोलून बातमी शोधा

Good News: लग्नसमारंभांसाठी या आठवड्यात सूट
Good News: लग्नसमारंभांसाठी या आठवड्यात सूट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : वीकेंड लॉकडाउनमुळे लग्नसमारंभात आलेली अडचण महापालिकेने दूर केली आहे. केवळ या आठवड्यात शनिवारी व रविवारी असणाऱ्या लग्नसोहळ्याला कडक अटींसह परवानगी देण्यात आली आहे. वधू आणि वराकडील केवळ पन्नास लोकांना समारंभास उपस्थित राहत येणार आहे.

कोरोना संसर्गवाढीमुळे राज्य शासनाने राज्यभरात दर शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाउन घोषित केले आहे. याच शनिवारी, २४ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पण २४ व २५ रोजी विवाह मुहूर्त असल्याने शहरात अनेकांनी लग्नसोहळ्याची तयारी केली होती. अचानक वीकेंड लॉकडाउन घोषित झाल्याने प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आज वधू-वरांकडील मंडळींनी महापालिकेत धाव घेतली. पण, महापालिकेने लग्नसमारंभांसाठी पोलिस परवानगी घेण्यास सांगितले. तर स्थानकात गेल्यानंतर पोलिसांनी आधी महापालिकेची परवानगी आणावी, असे सांगितले. त्यामुळे नेमके परवानगीसाठी जावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर काहींनी याबाबत महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी केवळ या शनिवारी आणि रविवारसाठी वीकेंड लॉकडाऊन काळात लग्नसमारंभाला परवानगी दिली.

सध्या लग्नसराईसाठी म्हणून अनेकांनी मंडप, मंगल कार्यालये शनिवार आणि रविवारसाठी बुकिंग केले आहे. तर, कॅटरिंग, डेकोरेशन, बॅन्ड आदी सर्वांचे बुकिंग करुन त्यांना ॲडव्हान्सही देण्यात आला आहे. यासह सर्व निमंत्रित पाहुण्यांना लग्नपत्रिकांचेही वाटप करण्यात आले आहे. पण वीकेंड लॉकडाऊनमुळे अडचण आली होती. अखेर ही समस्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी केवळ या शनिवार आणि रविवारसाठी लग्नसमारंभांना परवानगी दिली आहे.

लग्नसमारंभासाठी घालण्यात आलेल्या अटी

लग्नसमारंभात केवळ ५० लोकांनाच प्रवेश

नावांची यादी महापालिकेला द्यावी लागणार

वधू, वराचे आधारकार्ड झेरॉक्स द्यावे लागेल

कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन

१२ वर्षांवरील व ६० वर्षांखालील लोकांनाच प्रवेश

लग्नस्थळापर्यंत पोहचणे अवघड

लग्नसमारंभाला जरी महापालिकेने परवानगी दिली असली तरी लॉकडाउनमुळे लग्नासाठी उपस्थित राहणारे विविध भागांतून लग्नाच्या ठिकाणी पोहचणार कसे, हा प्रश्न निर्माण आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असेल. पोलिस लोकांना घराबाहेरही पडू देणार नाहीत. त्यामुळे लग्नकार्य केवळ घरच्यांच्या उपस्थितीत पार पाडावे लागणार आहे.

Edited By- Archana Banage