'कॉफी विथ सकाळ'मध्ये बौद्ध धर्माच्या शिकवणीवर चर्चा

परशुराम कोकणे
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

डीजेवर नाचण्यापेक्षा तरुणांनी बाबासाहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृतिशील व्हावे, असे आवाहन विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने 'सकाळ' कार्यालयात आयोजित 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमात बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. 

सोलापूर: माणसाला माणूस म्हणून जगण्यात अडचण ठरणाऱ्या चालीरीतींना सोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मात समानता हाच महत्त्वाचा धागा आहे. युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश बाबासाहेबांनी जगाला दिला आहे. बाबासाहेबांची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करा. डीजेवर नाचण्यापेक्षा तरुणांनी बाबासाहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृतिशील व्हावे, असे आवाहन विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने 'सकाळ' कार्यालयात आयोजित 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमात बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कोणत्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नव्हती. माणसाला माणूसपणाची जाणीव मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. जातीविरहित समाज निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1935 मध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. विविध धर्मांचा अभ्यास केला आणि मग शेवटी भगवान बुद्धांचा सर्वांना पुढे नेणारा बौद्ध धर्म स्वीकारला. कोणत्याही धर्माच्या, समाजाच्या धर्माच्या भावना न दुखवता सर्वांनी आपले उत्सव साजरा करावेत. 
- प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे, हिंदी विभाग प्रमुख, संगमेश्‍वर महाविद्यालय 
 
विहार तेथे ग्रंथालय या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. शहरासह मंगळवेढा आणि पंढरपूर येथेही पुस्तके देण्यात आली आहेत. जयंती उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांचा समावेश केला जात आहे. 
- सत्यजित वाघमोडे, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवांच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आम्ही लोकप्रबोधनाचे काम या उत्सवाच्या निमित्ताने करीत आहोत. 
- विक्रांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते 

उत्सवाच्या निमित्ताने तरुण एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. फक्त उत्सवापुरता आपला उत्साह न दाखवता वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कृतिशील व्हायला हवे. सर्वांनी धर्माचे आचरण करायला आहे. डीजेवर नाचण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन सर्वांनी करावे. बौद्ध धम्मात समतेचा विचार दिला आहे. 
- आर. वाय. सुरवसे, भारतीय बौद्ध महासभा 

धम्म म्हणजे विचार. प्रवर्तन म्हणजे वर्तणूक. चांगल्या विचारांची वर्तणूक करण्यासाठी बौद्ध धम्म आहे. कोणताही धर्म द्वेष निर्माण करा असे सांगत नाही. बाबासाहेबांनी शांतीच्या मार्गाने क्रांती केली. माणसाला माणूस म्हणून जगण्यात अडचण ठरणाऱ्या चालीरीतींना बाबासाहेबांनी सोडून देऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मात समानता हाच महत्त्वाचा धागा आहे. युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. 
- प्रा. डॉ. किशोर जोगदंड, वसुंधरा महाविद्यालय 
 
सारनाथ येथे बुद्धांनी पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. बौद्ध धर्मात कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका नाही. बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि मग शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. अनुयायांनी 22 प्रतिज्ञांचे पालन करायला हवे. मध्यम मार्गाचा आणि मानवाच्या कल्याणासाठीचा हा धर्म आहे जगभरात बौद्ध धर्मात येण्यासाठी ओढा वाढत आहे. 
- बबन शिंदे, बौद्धाचार्य, सोलापूर 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन लाखो बहुजनांना उन्नतीचा मार्ग दाखविला. आज बौद्ध धर्मातील बांधव सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत. बाबासाहेबांनी महिलांना पुढे येण्याची संधी मिळवून दिली. राज्यघटनेत प्रत्येकाला समानतेची वागणूक दिली. सर्वांनी कायद्याचे पालन करायला हवे. 
- अनिता रणशृंगारे, विधिज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion on the teachings of Buddhism in Coffee with Sakal