परदेशी कांदा बेचव

दौलत झावरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला गावरान कांदाही संपत आला आहे.

नगर : आवक कमी व मागणी जास्त असल्याने कांद्याचे भाव शंभर रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. त्यामुळे इजिप्त व तुर्कस्तानातून कांद्याची आयात केली आहे. मात्र, परदेशी कांदा बेचव असल्याने सर्वसामान्यांच्या पसंतीला तो उतरत नाही. 

एक नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019दरम्यान कांद्याला एक रुपया ते दोन रुपये भाव होता. भावात घसरण झाल्याने राज्य सरकारतर्फे तातडीने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपयांप्रमाणे जिल्ह्यातील 13 लाख 33 हजार 636 शेतकऱ्यांना 97 कोटी 50 लाख 254 अनुदान दिले. यंदा परिस्थिती बदलली आहे. 

परतीच्या पावसाने नुकसान 
परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला गावरान कांदाही संपत आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील नियोजनच कोलमडले आहे. 

व्यवसायिकांना फायद्याचा 
इजिप्त व तुर्कस्तानातून कांद्याची आयात केली आहे. हा परदेशी कांदा आकाराने मोठा असतो. भाजी किंवा अन्य पदार्थांसाठी कापल्यास उर्वरित कांदा वाया जातो. त्यामुळे गृहिणी तो खरेदी करण्यास धजावत नाहीत. तो कांदा केवळ हॉटेले, उपाहारगृहांसाठीच फायद्याचा ठरतो. 

आकर्षणामुळे खरेदी 
परदेशी कांदा आपल्याकडे विक्रीस आल्यानंतर त्याच्या आकर्षणामुळे किरकोळ स्वरूपात सर्वसामान्यांकडून खरेदी केली जाते. बेचव असल्याने त्याला मागणी कमी राहते. 

उन्हाळ कांद्याच्या लागवडी उशीर 
परतीच्या पावसामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडींना उशीर झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा बाजारात उशिरा दाखल होणार आहे. तोपर्यंत भाव तेजीतच राहणार आहेत. कांद्याच्या भावातील ही तेजी जानेवारीपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

चांगल्या कांद्याला भाव 
उन्हाळ कांदा संपत आला आहे. लाल कांद्याचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला मागणी वाढली असून, भावात वाढ झाली आहे. आज चांगल्या कांद्याला जास्त भाव मिळत आहे. 
- अरुण तनपुरे, सभापती, बाजार समिती राहुरी 

मागणी जास्त व आवक कमी 
मागणी जास्त व आवक कमी असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. चांगल्या मालाला चांगला भाव आजही मिळत आहे. 
- प्रशांत गायकवाड, सभापती, पारनेर बाजार समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dislike foreign onion