मनसे पदाधिकाऱ्यांची नाराजी "कृष्णकुंज'वर झाली दूर

जयसिंग कुंभार
Wednesday, 17 February 2021

सांगली जिल्ह्यातील "मनसे'चे पेल्यातले वादळ पेल्यातच शमले आहे. राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे त्या पदावर पूर्ववत काम करण्याचे आदेश दिले.

सांगली ः जिल्ह्यातील "मनसे'चे पेल्यातले वादळ पेल्यातच शमले आहे. राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे त्या पदावर पूर्ववत काम करण्याचे आदेश दिले. त्यांच्या "कृष्णकुंज' निवासस्थानी काल आणि आज बैठका झाल्या. या बैठकीस नाराज पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित होते. 

उपाध्यक्ष, सचिवांसह गेल्या सात फेब्रुवारीला जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगरे, जिल्हा सचिव आशिष कोरी, महापालिका क्षेत्र अध्यक्ष विनय पाटील, सांगली शहर अध्यक्ष दयानंद मलपे आणि कुपवाड शहर सचिव सागर चव्हाण यांनी सोशल मीडियावरून राजीनामे दिल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी या विषयावर फार बोलणार नाही, बोलण्यासारखे काही नाही, अशी भूमिका घेतली होती. तथापि त्यांची नाराजी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या कारभाराविरोधातच होती. 

काल नाराजांनी कृष्णकुंज गाठून पक्षनेते ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर आज जिल्हाध्यक्ष सावंतही उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी प्रथमच पदाधिकाऱ्यांना मुक्तपणे वेळ दिला. बैठकीअंती श्री. ठाकरे यांनी तुम्ही साऱ्यांनी आहे त्या पदावर काम करा असे बजावले. बैठकीतील चर्चेचा सखोल तपशील मात्र बाहेर आला नाही. नाराजांनी आम्ही राजसाहेबांच्या आदेशानुसार पक्षवाढीसाठी जोमाने काम करीत राहू, असे "सकाळ'ला सांगितले. 

पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचे स्वरूप किरकोळ होते. राजसाहेबांनी सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाने माझ्याकडे माथाडी संघटनेची राज्य सरचिटणीस पदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवली आहे.
- तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष, सांगली 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The displeasure of MNS office bearers on "Krishnakunj" went away