बडव्यांच्या नव्या विठ्ठल मंदिरामुळे वाद

अभय जोशी
शनिवार, 11 मे 2019

सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील स्वतंत्र मंदिर उभा केल्याने स्थानिक पातळीवर नवीन वाद सुरू झाला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे उत्पात आणि सेवाधारी परंपरागत कार्यरत होते 15 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांचे हक्क संपुष्टात आणले. या पार्श्वभूमीवर कुलधर्म कुलाचारासाठी उत्पात समाजाने नवरात्रात वशिष्ट आश्रमातील जागेत सुबक आणि आकर्षक अशा श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यावेळी ही वाद निर्माण झाला होता.

दरम्यान बडवे समाजाचे नेते बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्रीविठ्ठलाचे छोटेखानी मंदिर उभा केली आहे. काल त्या ठिकाणी श्रीविठ्ठलाच्या सुंदर मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

यासंदर्भात बाबासाहेब बडवे यांना विचारले असता सकाळ शी बोलताना ते म्हणाले, आपण आपल्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. याठिकाणी बडवे समाजातील आणि अन्य धार्मिक लोक नित्य उपासनेसाठी आले तर आपल्याला आनंदच वाटेल. पंढरपुरात अनेक ठिकाणी मठात अन्य मंदिरात तसेच बडवे आणि क्षेत्रोपाध्ये  यांच्या घरात विठ्ठलाच्या मूर्ती पूर्वीपासून आहेत. आमचा हेतू प्रामाणिक आणि शुद्ध आहे. मुख्य मंदिराची स्पर्धा करण्याचा विचार कोणाच्याही मनाला शिवलेला नाही.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील म्हणाले, साने गुरुजींनी जेव्हा हरिजनांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी उपोषण केले होते त्यावेळी त्यावेळच्या सनातनी ब्राह्मणांनी श्रीविठ्ठलाचे तेज काढून ते घागरीत ठेवण्याचा हास्यास्पद प्रकार केला होता. अनेक सनातनी लोकांनी हरिजन मंदिर प्रवेशास परवानगी मिळाल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाणेच बंद केले होते परंतु अशा मंडळींनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात मात्र पुन्हा मुख्य मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तसे पश्चातापाचे अश्रू गाळत पुन्हा मुख्य मंदिरात दर्शनाला येण्याची पाळी संबंधितांवर येऊ नये.

वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते

रामकृष्ण महाराज  वीर म्हणाले, या संदर्भात पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात. कोणी याला प्रति मंदिर म्हणेल तर कोणी सवतासुभा म्हणेल परंतु मूळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरचे बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांचे प्रेम तुस भर देखील कमी झालेले नाही. उपासनेला दृढ चालवावे, या वृत्तीला अनुसरून उत्पात आणि बडवे यांनी उपासना मंदिरांची स्थापना केलेली आहे. त्याबद्दल उत्पात आणि बडवे यांचे अभिनंदनच केले पाहिजे. विनाकारण काही मंडळी मात्र गैरसमज पसरवत आहेत. ही खेदाची बाब आहे.

Web Title: Dispute due to the new Vitthal Temple of Badwai