मोहिते-पाटील-माने-पाटील परिवारात संघर्ष? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सोसायटीच्या निमित्ताने मोहिते-पाटील आणि माने-पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याला पाहावयास मिळणार आहे. 

अकलूज सोसायटीवर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आहे. या संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांना मोहिते-पाटील परिवाराच्या संमतीनेच काम करण्याची संधी मिळाली आहे. खासदार मोहिते-पाटील यांच्या मर्जीनुसारच फत्तेसिंह माने-पाटील यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत मोहिते-पाटील आणि माने-पाटील परिवारात मतभेदाची दरी वाढत गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोहिते-पाटील परिवारातील तरुण नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खासदार मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील परिवाराने भाजपच्या विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली तर, माने-पाटलांनी थेट शरद पवार, अजित पवार यांच्याशी संपर्क साधून पूर्ण क्षमतेने तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिली आहे. आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे संपर्क कार्यालय सुरू करून त्यांनी अकलूजसह तालुक्‍यात राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा राबविली आहे. मोहिते-पाटील भाजपच्या विजयासाठी रान उठवत असताना माने-पाटील मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करीत होते. त्याचवेळी श्री. माने-पाटील यांच्या अध्यक्षपदावर गंडांतर येण्याचे संकेत मिळाले होते. आता या हालचालींना वेग आला आहे. 

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच या संस्थेच्या संचालकांची बैठक पार पडल्याची चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, संचालक पांडुरंगराव देशमुख, आरती सूर्यवंशी यांना बाजूला ठेवून पार पडलेल्या या बैठकीला लक्ष्मण आसबे, हरी वाघ, प्रतापराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, लक्ष्मण इंगोले, गोविंद तोरणे, तुकाराम एकतपुरे, सुभाष नरोळे, विजयालक्ष्मी कुरुडकर हे संचालक उपस्थित होते. या बैठकीत सोसायटीचे अध्यक्ष श्री. माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

अविश्‍वास ठराव की राजीनामा देणार 
खासदार मोहिते-पाटील व माने-पाटील हे सख्खे मावसभाऊ व चुलतभाऊ आहेत. खासदार मोहिते-पाटील यांच्यामुळेच श्री. माने-पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली होती. कौटुंबिक ऐक्‍याच्या बळावर मोहिते-पाटलांसोबत माने-पाटील परिवारातील सदस्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे तर, मोहिते-पाटलांच्या राजकीय वाटचालीत माने-पाटील परिवाराचे देखील महत्त्वाचे योगदान राहिले आहे. मात्र, आता दोन्ही परिवारांच्या राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. त्यातूनच माने-पाटलांच्या सोसायटीच्या अध्यक्षपदावर धुके दाटले आहे. मोहिते-पाटलांचे राजकीय वर्चस्व पाहता, अविश्‍वास ठराव मंजूर होण्यात कसलीही अडचण येईल असे वाटत नाही. असे झाले तर श्री. माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातात की, त्यापूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा देतात हे मात्र पाहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disputes in between Mohite Patil and Mane Patil families