वाळूचोरांनी रोखली पिस्तुले! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

घटनास्थळी काल (रविवारी) सायंकाळी वादावादीच्या प्रसंगी तीन जण होते. त्यांपैकी दोघांनी एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखली होती, अशी माहिती काही जणांनी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना दिली.

राहुरी : तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील दुर्गम-डोंगराळ भागातील म्हैसगाव ते कोळेवाडीदरम्यान मुसळे वस्तीनजीक भर रस्त्यात दोन वाळूचोरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पराकोटीच्या वादानंतर दोघांनी एकमेकांवर थेट गावठी पिस्तुले रोखली. त्या वेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. पाहणाऱ्यांनीही श्वास रोखले. प्रसंगावधान राखून काहींनी मध्यस्थी केल्याने वाद तात्पुरता मिटला आणि अनर्थ टळला. रविवारी (ता. एक) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. 

वाळूचोर भिडले 
शेरी-चिखलठाण येथे अतिवृष्टीमुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. जलयुक्त शिवार योजनेत बांधलेले बंधारे फुटले होते. ओढ्या-नाल्यांच्या आसपासच्या शेतजमिनी वाहून गेल्या होत्या. काही ठिकाणी वाळूची टेकाडे तयार झाली. संगमनेर तालुक्‍यातील काही वाळूचोरांनी या आपत्तीचाही फायदा उठविण्यास सुरवात केली आहे. या भागात वाळूचोर तुटून पडले आहेत. टेम्पोने वाळूचोरी सुरू आहे. म्हैसगाव ते खांबा-वरवंडीमार्गे संगमनेर तालुक्‍यात वाळूची चोरी होते. 

हेही वाचा "ते' टपलेत मृतदेहासाठी 

गुन्हा दाखल नाही 
घटनास्थळी काल (रविवारी) सायंकाळी वादावादीच्या प्रसंगी तीन जण होते. त्यांपैकी दोघांनी एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखली होती, अशी माहिती काही जणांनी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना दिली. राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले, की या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही; परंतु मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशीसाठी पोलिस घटनास्थळी पाठविले आहेत. काही नागरिकांनी घटना घडल्याचे सांगितले आहे; परंतु वाद घालणाऱ्यांची नावे अद्याप समजली नाहीत. 

वाळूतस्कर डोईजड 
जिल्ह्यात वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी ठोस पावले उचलले असले तरी वाळूचोरी कमी होईना. दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्‍यात तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला. काल पुन्हा वाळूचोरांमध्ये टोळीयुद्धासारखाच प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा वाळूचोरांमार्फत गुन्हेगारी फोफावत असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा कांद्याला विक्रमी भाव 
 

पोलिस घटनास्थळी पाठविले 
पिस्तूल रोखल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठविले होते. काही लोकांनी वाद झाल्याचे सांगितले आहे. मात्र, कोणी कोणावर पिस्तूल रोखले हे अद्याप समजले नाही. 
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, राहुरी 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes in the sandthives