दोन शाळांतील अंतर मोजले जाणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सातारा - प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरून संवर्ग दोनचा लाभ घेतलेल्या पती-पत्नी शिक्षकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाला तक्रार झालेल्या शिक्षकांच्या शाळांतील अंतर मोजण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापर्यंत (ता. 28) हे अंतर मोजून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया राबविताना शिक्षकांवर विश्‍वास ठेवत त्यांनाच ऑनलाइन माहिती भरण्याचे सूचित केले होते. मात्र, त्याचा अनेकांनी गैरफायदा घेतला असल्याचेही समोर आले आहे. संवर्ग दोन या विशेष संवर्गाचा लाभ पती-पत्नी शिक्षिका अथवा दोघांपैकी एक जण कायमस्वरूपी शासकीय, निमशासकीय संस्थांत नोकरीस असल्यास लाभ घेता येतो. दोघांच्या नोकरीच्या ठिकाणातील अंतर 30 किलोमीटरच्यावर असल्यास 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतरातील शाळा संबंधितांना देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 23 शिक्षकांनी 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असतानाही जास्त अंतर असल्याचे दाखविण्यात आल्याची काही शिक्षकांनी तक्रार केली आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाला दोन शाळांतील अंतर मोजण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपर्यंत हे अंतर मोजून त्याबाबतचा प्रस्ताव मागविला आहे. त्यामुळे या प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

पुन्हा एसटीचे अंतर! 
दोन शाळांतील अंतर कसे मोजले जावे, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने शिक्षकांनी प्रथम परिवहन महामंडळाद्वारे अंतरे घेतली. त्याचे दाखले प्रशासनाला दिले. मात्र, पुढे ते ग्राह्य धरण्यात आले नाहीत. त्यामुळे काही शिक्षकांनी गुगलमॅपद्वारे अंतर मोजून संबंधितांवर तक्रारी केल्या. आता जिल्हा परिषदेने एसटी ज्या मार्गाने जाते, त्या मार्गाने अंतर मोजण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या अस्पष्ट धोरणांमुळे त्याचा त्रास शिक्षकांना होत आहे. 

"ससून'मध्ये तपासणी होणार 
संवर्ग एकचा लाभ घेताना अनेक शिक्षकांनी अपंगत्वाचे तसेच दुर्धर आजारांचे प्रमाणपत्र जोडले आहे. त्यावरही अनेक शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्रांची खातरजमा करण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात संबंधित शिक्षकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी, असेही आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

Web Title: Distance between the two schools will be counted