पंधरा लाख ठेवण्यासाठी वाटल्या पिशव्या

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

 पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस यंग ब्रिगेडने मंगळवारी आठवडा बाजाराच्या दिवशी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना रिकाम्या पिशव्या वाटल्या आणि पंतप्रधानांकडून मिळणारे पंधरा लाख रुपये त्यात ठेवावेत, असे आवाहन केले.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस यंग ब्रिगेडने मंगळवारी आठवडा बाजाराच्या दिवशी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना रिकाम्या पिशव्या वाटल्या आणि पंतप्रधानांकडून मिळणारे पंधरा लाख रुपये त्यात ठेवावेत, असे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस यंग ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी रिकाम्या पिशव्या वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरवात आज (मंगळवार) त्यांनी आठवडा बाजारातून केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

देशात सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरीकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा होतील, असे मोदी यांनी सांगितले आहे. ते लवकरच सोलापूर दौऱ्यावर येत असून, येताना नऊ लाख सोलापूरकरांसाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपये आणणार आहेत. ही रक्कम ठेवण्यासाठी या पिशव्या आहेत, या पिशव्यामध्ये पंधरा लाख रुपये ठेवावेत, असे आवाहन चाकोते यांनी यावेळी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आल्यावर यंग ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते रिकाम्या पिशव्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे.
येत्या आठ दिवस आम्ही या पिशव्या घरोघरी जाऊन वाटणार आहोत.
- सुदीप चाकोते, अध्यक्ष, काँग्रेस यंग ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट्र

Web Title: distribution of bags for keeping 15 lakhs