जिल्ह्याला ७.४४ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट - अनिल अंजनकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

सातारा - शतकोटी वृक्षलागवडींतर्गत गतवर्षी जिल्ह्यात चार लाख २७ हजार वृक्षांची लागवड केली होती. यावर्षीही सात लाख ४४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. जिल्हा हरित करण्यासाठी नागरिकांनी हरित सेनेत अधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे. 

सातारा - शतकोटी वृक्षलागवडींतर्गत गतवर्षी जिल्ह्यात चार लाख २७ हजार वृक्षांची लागवड केली होती. यावर्षीही सात लाख ४४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. जिल्हा हरित करण्यासाठी नागरिकांनी हरित सेनेत अधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे. 

यावर्षी जिल्ह्याला सात लाख ४४ हजारांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये वन विभागाकडून तीन लाख ३५ हजार, इतर विभागांकडून एक लाख ३८ व ग्रामपंचायतींकडून एक लाख ७७ हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. या हरित सेनेमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी (कार्यरत व सेवानिवृत्त), खासगी संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात. सामूहिक स्वरूपातसुद्धा सदस्य नोंदणी करता येईल. यामध्ये निमशासकीय संस्था, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा समावेश आहे. नोंदणीसाठी 

आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र,  शालेय/महाविद्यालयीन ओळखपत्र, पारपत्र, शासकीय, निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र सादर करून ग्रीन आर्मीमध्ये सहभाग नोंदवू शकता. प्रत्येक नागरिकाला वन व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करता येईल. वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरिता सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साजरा केला जाणारा वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन इत्यादीमध्ये सहभाग घेता येणार आहे. वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणासंबंधित सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली तसेच इतर जनजागृती कार्यक्रमांमध्ये हरित सेनेमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांना सहभाग घेता येणार आहे. जे स्वयंसेवक वर्षभर सक्रिय सहभाग घेतील, त्यांना शासनामार्फत परितोषिक देवून पुरस्कृत करण्यात येणार आहे.

संकेतस्थळावर जास्तीत जास्त नावे नोंदवा
जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हरित सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in  या संकेतस्थळावर जास्तीत जास्त नावे नोंदवावीत, असे आवाहनही श्री. अंजनकर यांनी केले आहे.

Web Title: The district aims to 7.44 million tree plantation