‘सिव्हिल’मध्ये शस्त्रक्रियांचा बोजवारा

प्रवीण जाधव
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सातारा - जिल्हा रुग्णालयातील मुख्य शस्त्रक्रियागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने केलेली तात्पुरती पर्यायी व्यवस्था पुरेसी नाही. त्यातच भूलतज्ज्ञांची कमतरता. त्यामुळे प्रसूती व्यतिरिक्तच्या अन्य शस्त्रक्रिया रखडत आहेत. एक- दोन महिन्यांनंतरची तारीख मिळत असल्याने रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सातारा - जिल्हा रुग्णालयातील मुख्य शस्त्रक्रियागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने केलेली तात्पुरती पर्यायी व्यवस्था पुरेसी नाही. त्यातच भूलतज्ज्ञांची कमतरता. त्यामुळे प्रसूती व्यतिरिक्तच्या अन्य शस्त्रक्रिया रखडत आहेत. एक- दोन महिन्यांनंतरची तारीख मिळत असल्याने रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. याठिकाणी सर्वच विभागांच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती असते. त्यामुळे प्रसूती, सर्जरी, अर्थोपेडिक, कान- नाक- घसा यांच्या बहुतांश शस्त्रक्रिया या रुग्णालयात होतात. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियांचा खर्च मोठा असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा शस्त्रक्रियांसाठी जिल्हा रुग्णालयावरच अवलंबून असतो. तालुक्‍याच्या अन्य ठिकाणी या शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक शस्त्रक्रियांसाठी जिल्हा रुग्णालयात येतात.

जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांची तपासणी व इतर चाचण्या झाल्यानंतर रुग्णाला शस्त्रक्रियेची तारीख मिळते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या व उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाण पाहता रुग्णांना एक- एक महिन्यांच्या कालावधीपर्यंत शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागत होती. आता जिल्हा रुग्णालयातील मुख्य शस्त्रक्रियागृहाचेचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने शस्त्रक्रियांचा बोजवाराच उडाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील मुख्य शस्त्रक्रियागृहा मध्ये प्रसूती, अर्थोपेडिक व सर्जरी विभागासाठी दोन- दोन टेबल होते. त्यामुळे सर्व विभागांच्या शस्त्रक्रिया एकाच वेळेत सुरू राहायच्या. आता ते मुख्य शस्त्रक्रियागृह नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याच मजल्यावर दुसरीकडे तात्पुरते शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांच्या संख्येचा विचार करता ते पुरेसे करण्यात आलेले नाही. या शस्त्रक्रियागृहामध्ये केवळ दोनच टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील एक टेबल हा प्रसूती शस्त्रक्रियांसाठी उपयोगात आणला जात आहे.

त्यामुळे एकाच टेबलवर कान- नाक- घसा, सर्जरी व अर्थोपेडिक विभागाच्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठीच्या सध्याच्या वेळेत कोणी शस्त्रक्रिया करायचा असा प्रश्‍न आहे. त्यातच अर्थोपेडिकच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्‍यक असलेल्या अन्य साहित्य या टेबलला नाही. त्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रियांवरही मर्यादा येत आहे. शस्त्रक्रिया गृहाअभावी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातच भूलतज्ज्ञांच्या कमतरतेने भर घातली आहे. टेबलही नाही व भूलतज्ज्ञही अशा दुहेरी कात्रीत शस्त्रक्रिया अडकल्या आहेत. त्यामुळे सर्जरी व अर्थोपेडिक विभागाच्या शस्त्रक्रिया रोडावल्या आहेत, तर कान- नाक- घशांच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. 

रुग्णांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी जादा टेबलची व्यवस्था करणे वा डॉक्‍टरांच्या वेळांचे नियोजन करणे या सारखे उपाय करण्याऐवजी वरिष्ठांकडून रुग्णांना एक ते दोन महिन्यानंतरच्या तारखा द्या असा तुघलकी कारभार वरिष्ठांकडून होत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजी पसरली आहे.

वेळेत काम होणे आवश्‍यक
मुख्य शस्त्रक्रियागृहाचे काम सुरू झाले आहे; परंतु त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे या कामात चालढकल होता काम नये, याची खबरदारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेणे आवश्‍यक आहे. ठरलेल्या वेळेत शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण करण्याबरोबरच तात्पुरत्या प्रभावी उपाययोजनांची त्यांच्याकडून रुग्णांना अपेक्षा आहे.

Web Title: District Civil Hospital Surgery