सहकारमंत्र्यांचा अर्धा जिल्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत 

तात्या लांडगे
सोमवार, 14 जानेवारी 2019

सोलापूर : सहकाराची पंढरी आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 20 हजार शेतकऱ्यांना मागील दिड वर्षांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील एक लाख 30 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 737 कोटी रुपये कर्जमाफीतून मिळाले आहेत. 

वरुणराजाची हुलकावणी, गारपीट, अवकाळी अन्‌ दुष्काळ या निसर्गाच्या संकटातून मार्ग काढत पोटच्या मुलांप्रमाणे शेती पिकविणारा बळीराजा मागील काही वर्षांपासून अडचणीत सापडल्याचे पहायला मिळते. त्यातच पुन्हा शेतमालाचे गडगडलेल्या दरामुळे उत्पादनाचा खर्चही भागत नसल्याचे दिसून येते. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय 28 जून 2017 मध्ये घेतला. त्याला आता दिड वर्षे झाले तरीही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला पाण्याकरिता वारंवार संघर्ष करावा लागतोय. कारखान्यांकडून उसाची एफआरपी वेळेवर मिळत नाही, कर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर सरकारने तत्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

कुटुंबाऐवजी आता वैयक्‍तिक कर्जदाराला दिड लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यानुसार माहिती शासनाला पाठविली आहे, त्याची पडताळणी झाल्यानंतर बॅंकांना याद्या प्राप्त होतील. तत्पूर्वी ओटीएस योजनेंतर्गत दिड लाखांवरील रक्‍कम शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत भरावी. 
- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

जिल्ह्याची बॅंकनिहाय कर्जमाफी 
बॅंक लाभार्थी रक्‍कम 
जिल्हा मध्यवर्ती बॅंक 90,761 464.86 कोटी 
राष्ट्रीयीकृत बॅंका 32,422 213.60 कोटी 
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक 7,801 58.57 कोटी 
एकूण 1,30,984 737.03 कोटी

Web Title: district of cooperative minister is in waiting of loan waiver