जिल्हा बॅंकेला 16 कोटींचा फटका 

जिल्हा बॅंकेला 16 कोटींचा फटका 

सातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला नोटाबंदीचा फटका बसला असून, व्यवहारांवर मर्यादा येऊन बॅंकेत अद्यापही जुन्या चलनातील शंभर कोटी रुपये पडून आहेत. या सर्व परिस्थितीमुळे या वर्षी जिल्हा बॅंकेला साधारण 16 कोटींचा फटका बसला आहे. बॅंकेला निव्वळ 40 कोटी इतकाच नफा झाला असून, त्यातून सभासद व ग्राहकांसाठी विविध तरतुदी केल्या आहेत, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

बॅंकेच्या वार्षिक उलाढालीची माहिती देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""नोटाबंदी व बॅंकेच्या व्यवहारांवर आणलेले नियंत्रण यामुळे नफ्यावर परिणाम झाला आहे. आमचे काही ग्राहक इतर बॅंकांकडे जाऊ लागले आहेत. नोटाबंदीमुळे बॅंकेला 16 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. जुन्या नोटा अद्यापही बॅंकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅंक व शासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. बॅंकेला 85.37 कोटी करपूर्व नफा झाला असून, बॅंकेने या वर्षात 20 कोटी 24 लाख रुपये इतका प्राप्तिकर भरला आहे. करोत्तर नफा 65.13 कोटी इतका आहे. बॅंकेचा निव्वळ नफा केवळ 40 कोटी रुपये असून, यातून बॅंकेच्या संचालक मंडळाने विविध तरतुदी केल्या आहेत. यामध्ये एक लाखांपर्यंत अल्पमुदत कर्ज शून्य टक्के दराने, तर एक ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्या सभासदांना दोन टक्के इतकी सवलत देण्याची तरतूद केली आहे. एक ते तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे, तसेच शासकीय अनुदान व ठिबक सिंचन संच पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्यातून ठिबक सिंचन प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी सभासदांकडे कर्ज वापर कालावधीतील व्याज किंवा कमाल एकरी पाच हजार रुपये यापैकी कमी असेल त्या रकमेसाठी व्याजापोटी एक कोटी आठ लाखांची तरतूद केली आहे. गोडाऊन, इमारत बांधकाम, कर्ज व्याज सवलत प्रोत्साहन योजनेंतर्गत व्याजात संपूर्ण सूट दिली जाणार आहे. त्यासाठी अकरा लाखांची तरतूद केली आहे. शंभर टक्के वसुली करणाऱ्या विकास सोसायट्यांना 12 हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे 125 संस्थांना 15 लाखांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. परदेशात शिक्षणासाठी असलेल्या मुलांच्या पालकांना कर्जावर व्याज भरावे लागते. ही बाब लक्षात घेऊन कर्ज सवलत कालावधीत गेल्या वर्षीअखेर 50.94 लाख रुपये व्याज कर्ज खात्यात जमा केले आहे. यावर्षीही या योजनेंतर्गत वाटप केलेल्या कर्जावरील एक कोटी सहा लाखांचे व्याज परत करण्याची तरतूद केली आहे, तसेच शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध केले आहे. मार्च 2017 अखेर बॅंकेने 5900 कोटींच्या ठेवी संकलित केल्या आहेत. 

वॉटर कपसाठी 25 लाखांचा निधी 

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकेने 25 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे यांत्रिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरीच्या डिझेलसाठी दिले जाणार आहेत. लवकरच या गावांना धनादेशांचे वाटप केले जाणार आहे, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com