वैद्यकीय अधिकारी मिळणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाला फिजिशियनसह अन्य सहा वैद्यकीय अधिकारी मिळणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची पुण्याची वारी थांबण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. 

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाला फिजिशियनसह अन्य सहा वैद्यकीय अधिकारी मिळणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची पुण्याची वारी थांबण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता हा जिल्हातील शासकीय रुग्णालयांतील ऐरणीवरचा प्रश्‍न. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची उपचाराची नेहमीच परवड होते. जिल्हा रुग्णालयामध्ये खाटांच्या मंजूर क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अधिकृत खाट संख्येनुसार मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारीही पूर्णपणे भरलेले नाहीत. त्यामुळे आंतर व बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांच्या उपचाराची गैरसोय होते. जिल्ह्यातील विविध भागांतून अपघातग्रस्त तसेच गंभीर स्वरूपाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे साताऱ्यात आलेल्या रुग्णांना थेट पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात येत होते. त्याचबरोबर पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तातडीने वैद्यकीय अधिकारी भरण्याची मागणी होत होती.

जिल्हा रुग्णालयातील ही अडचण दूर करण्यासाठी नुकतीच भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये सहा वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालयासाठी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये फिजिशियनचाही समावेश आहे. एमबीबीएस, डीएनबी असलेला फिजिशियन निवडण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचाराचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. त्याचबरोबर हिमॅटोलॉजी, नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग व सहा ते १८ वर्षांच्या मुलांच्या तपासणीसाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची निुयक्ती करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रियेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्‍न काही प्रमाणात मार्गी लागेल. त्याचबरोबर शासनाशी करार केलेले नवे वैद्यकीय अधिकारीही लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून मिळतील. फिजिशियन वर्गचे पदही भरले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: district government hospital medical officer