साताऱ्यात तज्ज्ञाअभावी मनोरुग्णांची होतेय परवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

सातारा - मनोविकार तज्ज्ञ नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या मनोरुग्णांची परवड होत आहे. औषधोपचाराबरोबर अपंग प्रमाणपत्रांसाठी येणारी ही अडचण दूर करण्यासाठी तातडीने मनोविकार तज्ज्ञांच्या नियुक्ताचा प्रश्‍न मार्गी लावणे आवश्‍यक आहे.

तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक जिल्हा रुग्णालयात येत असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयातील विविध तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यातच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाहेर बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

त्यातच मनोविकार तज्ज्ञ केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच उपलब्ध होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून या आजाराचे रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये येत होते. या आजाराच्या उपचारावरील खासगी रुग्णालयांमध्ये असलेला खर्च सामान्य रुग्णाला परवडण्यासारखा नसतो. त्यामुळेही जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या वाढली होती. गेल्या काही महिन्यांपासून मनोरुग्णांच्या औषधाचा तुटवडा जिल्हा रुग्णालयात जाणवत होता. त्यामुळे रुग्णांना बाहेर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यातही जेनरिक औषधांमुळे काही प्रमाणात रुग्णांचा आर्थिक भुर्दंड वाचला गेला. मात्र, आता वैद्यकीय अधिकारीही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे मनोरुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. मनोविकार तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय त्यांना पुढील औषधेही घेता येणार नाहीत. दररोज अशा प्रकारचे सुमारे दीडशे रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे त्यांनी करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

औषधोपचाराबरोबरच मनोरुग्णाच्या अपंगत्वाच्या दाखल्यासाठी रुग्ण जिल्हा रुग्णालयावरच अवलंबून असतात. त्यासाठी ते रुग्णालयात येत असतात, तसेच पुण्यातील येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यासाठीही जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आवश्‍यक असते. रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक मनोरुग्णांना किंवा घरामध्ये ठेवणे शक्‍य नसलेल्या मनोरुग्णांनाही येरवड्याला नेण्यासाठी अशा प्रमाणपत्रांची आवश्‍यकता असते. त्यामुळे नातेवाईकांबरोबरच पोलिसांचीही आगामी काळात परवड होणार आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी केली. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देऊन तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

यशोधन संस्थेचा इशारा
मनोरुग्णांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या फलटण येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टने याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रश्‍नाची दाहकता मांडली आहे. त्यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: district hospital expert doctor psycho patient

टॅग्स