रुग्ण, नातेवाइकांची दुर्गंधीपासून मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

जिल्हा रुग्णालयांतर्गत या जबाबदारीचे वाटप केले होते. परंतु, योग्य काम होत नव्हते. सध्या पदभार असलेले अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व सर्वांच्या प्रयत्नांना पालिका पदाधिकारी व प्रशासनाने मदत केल्याने सर्व कचरा हटविला गेला. या पुढे असा कचरा साचल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये वातानुकुलित यंत्रणा बसविली नसल्यामुळे दुर्गंधी यायची. त्यातच बेवारस मृतदेह तीन दिवस ठेवावे लागतात. त्यामुळे तो मृतदेह सडून त्यातून मोठ्या प्रमाणावर वास येत असे. या त्रासामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईकांबरोबरच परिसरातील नागरिकही वैतागलेले होते. मात्र, डॉ. सुरेश जगदाळे यांच्या कार्यकाळात या गृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे या दुर्गंधीपासून सर्वांची मुक्तता झाली होती. परंतु, जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या परिसरात पुन्हा दुर्गंधी पसरायला लागली होती. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे.

त्यामध्ये शासकीय कार्यालयांना महत्त्वाची भूमिका बजावण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु, त्याला हरताळ फासत निव्वळ साधा कचराच नाही तर, मेडिकल वेस्टचीही जिल्हा रुग्णालयात योग्य रितीने विल्हेवाट लावली जात नव्हती. या कचऱ्याचे ढिगच्या-ढीग शवविच्छेदनगृहाजवळील मोकळ्या जागेमध्ये रचण्यात आले होते. गेली कित्येक महिने हा कचऱ्याचा ढिगारा या ठिकाणी साचवला जात होता. गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. त्यामुळे हा कचरा सडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे या परिसरात पुन्हा दुर्गंधी पसरायला लागली होती. शवविच्छेदन झालेला मृतदेह नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही या ठिकाणी उभे राहायला येत नव्हते. याबाबत ‘सकाळ’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करून वस्तुस्थिती मांडली होती.

‘सकाळ’च्या वृत्ताची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर व डॉ. सुहास माने यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या प्रयत्नांना पालिका प्रशासनानेही सकारात्मक साथ दिली. मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य विभागाचे राजेंद्र कायगुडे, यादव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मदत केली. नुकताच या परिसरातील तब्बल दहा गाड्या कचरा योग्य ठिकाणी हलविण्यात आला. त्यामुळे हा परिसर दुर्गंधीमुक्त होण्यास मदत झाली आहे. यापुढे अशा प्रकारे कचऱ्याचे ढिगारे साचू नयेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Hospital Patient Relatives Pollution Free