गंभीर रुग्णांना बाहेरचा रस्ता!

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाची इमारत
सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयाची इमारत

सातारा - विशेष उपचारांकरिता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील एक हजार ८१५ रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. गेल्या दोन वर्षांत पुण्याला पाठवाव्या (रेफर) लागलेल्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत आहे. जिल्हा रुग्णालय हे केवळ किरकोळ उपचारांपुरतेच मर्यादित होत आहे. 

जिल्ह्यात माजी मुख्यमंत्र्यांसह ११ आमदार व दोन खासदार आहेत. तरीही जिल्हा रुग्णालयासाठी ‘एमडी’ डॉक्‍टर उपलब्ध होत नाही. जिल्ह्यातील सुमारे ३० लाख जनतेसाठी जिल्हा रुग्णालय व दोन कुटीर रुग्णालये आहेत. ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा दिल्या जातात. 

सुविधांची वानवा
जिल्हा रुग्णालयात विशेष उपचारांकरिता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. जे आहेत ते क्वचितच ओपीडीच्या वेळात भेटतात. ‘ओपीडी’ संपवून पळ काढण्याकडेच त्यांचा ओढा दिसतो. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या काळात जिल्हा रुग्णालयाचा कायापालट झाला. त्यांनी अनेक भौतिक सुधारणा घडवून आणल्या. मात्र, नंतरच्या काळात सुधारणांचा वेग मंदावला. सीटीस्कॅन मशिन कऱ्हाडला गेले. साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

उपचारांना मर्यादा
जिल्हा रुग्णालयात केवळ मूलभूत वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. अधिक उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले जात आहे. येथील संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी माहितीच्या अधिकारात जिल्हा रुग्णालयातून गैरसुविधांची माहिती मिळवली. त्यानुसार विशेष तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी २०१५ मध्ये १२९९ रुग्णांना ससूनला पाठविण्यात आले. २०१६-१७ मध्ये १७२६, २०१७-१८ मध्ये १८१५ रुग्णांना ससूनला जावे लागले. त्यात स्वत:हून डिस्चार्ज घेऊन खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश नाही. 

‘सिव्हिल’मध्ये केवळ किरकोळ उपचार
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा नाहीत. रुग्णाची प्रकृती थोडी गुंतागुंतीची वाटली, तर वैद्यकीय अधिकारी कोणताही धोका पत्करण्यापेक्षा रुग्णाला खासगी दवाखान्यात हलविण्याचा तोंडी सल्ला देतात. त्यामुळे बरेच रुग्ण स्वत:हून डिस्चार्ज घेत खासगी रुग्णालयाचा रस्ता धरतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात येते. त्यामुळे जिल्हा रुग्णालय केवळ घातपात, अपघातातील रुग्णांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

‘ससून’ला पाठविलेल्या रुग्णांची संख्या
2014-15  -  1299
2016-17   - 1726
2017-18  - 1815

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com