साताऱ्याचा पुढचा खासदार भाजपचाच : चंद्रकांत पाटील

साताऱ्याचा पुढचा खासदार भाजपचाच : चंद्रकांत पाटील

उंब्रज : पश्‍चिम महाराष्ट्र ही दोन्ही कॉंग्रेसची जहागिरी नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आजपर्यंत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. तुम्ही कितीही गप्पा मारल्या, कितीही यात्रा काढल्या तरी यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचा खासदार भाजपचाच असेल व जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

चोरे (ता. कऱ्हाड) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, हिंदूराव चव्हाण, जितेंद्र पवार, सागर शिवदास, संजय घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुरेश पाटील उपस्थित होते. प्रत्येक निवडणुकीत भाजप सरस ठरत आहे. निवडणूक आली की कॉंग्रेसवाले देव पाण्यात ठेवतात आणि ही तरी निवडणूक जिंकू दे, असा धावा करतात. 

निवडणुकीत विजय आपला राहिला नसल्याचे लक्षात आल्याने सर्व विरोधकांना एकत्र यावे लागत आहे. कारण ते भाजपशी एकएकटे लढू शकत नाहीत, असे नमूद करून  पाटील म्हणाले, "भाजप सरकारने शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी केली. कालपर्यंत 17 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत आणि आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न कळतात.'' अतुल भोसले म्हणाले, "स्वातंत्र्य काळापासून कोणी निधी दिला नसेल एवढा विकासनिधी कऱ्हाड उत्तर व चोरे भागासाठी भाजपने दिला आहे. तारळी धरणाचा प्रश्न असेल, इंदोली प्रादेशिक योजनेचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील तर ते 100 टक्के सोडवणारच.'' मनोज घोरपडे यांचेही भाषण झाले. 

मराठा समाजाचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. हेच सरकार मराठा आरक्षण देईल. - चंद्रकांत पाटील, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com