नव्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात आज कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

बॅंकांमध्ये गर्दी; तर एटीएमपुढे रांगाच रांगा!
सातारा - केंद्र सरकारने 500, हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतरचा परिणाम चौथ्या दिवशीही व्यवहारांवर झाला. नोटा बदलण्यासाठी व पैसे जमा करण्यासाठी बॅंका, टपाल कार्यालयात दिवसभर गर्दी होती. सकाळच्या सत्रात बहुतांश एटीएम मशिन बंद होत्या. दुपारनंतर एटीएम सुरू झाले; परंतु रांगाच रांगा लागल्याने पैसे संपल्यामुळे संध्याकाळी पुन्हा एमटीएम बंद होऊ लागले. पुरेशा प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आजही नोटांचा तुटवडा जाणवला.

पैसे नसल्याने संबंधित नागरिक सकाळपासूनच एमटीएम सुरू होण्याची वाट पाहत होते. त्यासाठी शहरातील अनेक एमटीएम केंद्रांवरही जाऊन येत असल्याने शहरभर एटीएम बंद आहे की चालू, याचीच चर्चा होती. अल्पशा प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर संबंधित बॅंकांनी दुपारनंतर एटीएम सुरू केले. ही चर्चा शहरभर पसरताच पुन्हा एमटीएमवर गर्दी सुरू झाली. त्यामुळे काही तासांतच पैसे संपल्याने पुन्हा "एटीएम बंद'चे फलक झळकू लागले. दरम्यान, जुन्या नोटा बदलून घेण्याबरोबरच पैसे भरण्यासाठी बॅंका व टपाल कार्यालयांत आजही गर्दी दिसत होती.

बॅंकांचा गहाळपणा...
रिझर्व्ह बॅंकेकडून स्टेट बॅंकेमार्फत नोटांचे वितरण केले जात आहे. मात्र, वितरणात जास्त कालावधी लागत असल्याने बॅंकांना उशिरा रक्‍कम मिळत आहे. परिणामी, एटीएममध्ये नोटा भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. दररोज हीच परिस्थिती राहिल्यास त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे. त्यामुळे बॅंकांना कामकाजातील गहाळपणा बाजूला ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

एटीएम सॉफ्टवेअरचे काय?
सध्याच्या एटीएम मशिनमधील ट्रे हे 100, 500, एक हजार रुपयांच्या नोटांच्या आकाराचे आहेत. नव्याने व्यवहारात आणलेली दोन हजार रुपयांची नोट उंचीने कमी आणि लांबी जास्त आहे. त्यामुळे या नोटा जुन्या ट्रेमध्ये बसत नाहीत. शिवाय, सॉफ्टवेअरमधील सेन्सरही 500, एक हजार रुपयांच्या नोटांच्या अनुषंगाने बसवले आहेत. हे सॉफ्टवेअर, ट्रे बदलणे तत्काळ शक्‍य नसल्याने बॅंकांपुढे अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, व्यवहार सुरळीत होण्यास अजूनही काही काळ जाण्याची चिन्हे आहेत.

Web Title: district permanent shortage of new currency