मला वगळून जिल्ह्याचे राजकारण केवळ अशक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

महादेवराव महाडिक-सर्वसामान्य माणूस हाच माझा पक्ष 

महादेवराव महाडिक-सर्वसामान्य माणूस हाच माझा पक्ष 

जिल्ह्याच्या राजकारणावर नजर टाकली, तर मला वगळून हे राजकारण होऊच शकत नाही. मी कधी सत्तेसोबत गेलो नाही तर सत्ताच माझ्यामागे सावलीसारखी येत राहिली. मी ज्याच्यासोबत राहतो त्याच्याशी प्रामाणिक राहतो, मला ज्या पायरीने मोठे केले त्या पायरीला मी कधी लाथ मारत नाही. प्रत्येकाकडे मी मित्रत्त्वाच्या नजरेनेच पाहत आलो, त्यामुळे मी कोणाला शत्रू मानत नाही; पण ज्यांनी माझा विश्‍वासघात केला, त्यांच्याशी मी कधीच दोस्तीचा हात पुढे करणार नाही, अशी दिलखुलास मुलाखत ताराराणी आघाडीचे संस्थापक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी "सकाळ'ला दिली. त्यांच्याशी झालेला हा संवाद. 

जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? 
महाडिक - या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाडिक गटाची ताकद आहे. ताराराणी आघाडी हा भाजपचाच एक भाग आहे. ज्याठिकाणी भाजपला उमेदवार उभे करणे शक्‍य नाही, त्याठिकाणी ताराराणी'चा उमेदवार आहे. भाजप-ताराराणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यातून जिल्ह्यात परिवर्तनाची लाट वेशीवर आल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीचाच झेंडा फडकेल. 

या निवडणुकीत तुमची ताकद काय? 
महाडिक - स्वतःच्या ताकदीचे मूल्यमापन करणे म्हणजे गर्व आहे. जिल्ह्यातील छोट्यातील छोटा माणूस हीच माझी ताकद आहे. ज्या शक्तीने मला आजपर्यंत तारले तो सामान्य माणूसच मी स्वतःची ताकद समजतो. 

मुलगा भाजपत, पुतण्या राष्ट्रवादीत मग ही सगळी सांगड घालता कशी? 

महाडिक - जिल्ह्यातील काही नेत्यांनी दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे माझे नेतृत्त्व तयार होत गेले. मी सरळ मार्गाने जाणारा माणूस आहे. जवळच्या माणसाने विश्‍वासघात केला तर कसे वागायचे हे ठरवावे लागेल. मैत्री शेवटपर्यंत निभावायची, माणसाला कधी तोडायचे नाही, यातूनच मग मुलगा, पुतण्या यांचे नेतृत्त्व उभारत गेले. आता ही सांगड घालणेही फार अवघड नाही. 

तुमचा नेमका पक्ष कोणता? 

महाडिक - हा प्रश्‍न सर्वच जण विचारतात. मी कॉंग्रेसमध्ये होतो; पण मला निलंबित करण्यात आले. या गोष्टीचे मला वाईट वाटले नाही; पण खेद जरूर वाटला. सर्वसामान्य, गरीब माणूस हाच माझा पक्ष आहे. मी पक्षात नसल्याने जिल्ह्यात कॉंग्रेसची अवस्था काय? हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. मला वगळून जिल्ह्याचे राजकारणच होऊ शकत नाही हाच संदेश यातून जातो. आज मी भाजपसोबत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. ज्याच्याशी राहतो त्यांच्याशी प्रामाणिकच राहतो, एवढे नक्की. 

महाडिक नेहमी सत्तेसोबत असा आरोप होतो, याबाबत काय मत आहे? 
महाडिक - मी सत्तेबरोबर नाही तर सत्ताच माझ्यामागे सावलीप्रमाणे येते. माझी जन्मकुंडलीच चांगली आहे. माझी विश्‍वासार्हता पाहून मला पक्षच जवळ करतो, मला सत्तेच्या मागून जाण्याची वेळ येत नाही. 

"दक्षिण'मध्ये काय करणार? 
महाडिक - वेगळे काहीच नाही, भाजपसोबत आहे. त्यांच्यासोबत नुसते राहणार नाही तर त्यांचे दक्षिणमधील सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी महाडिक ताकद लावणार. 

तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? 
महाडिक : मला अजून भाजपचे काय, पण कोणत्याही पक्षाचे निमंत्रण नाही. मी शिरोलीच्या कट्ट्यावर बसून जिल्ह्याच्या राजकारण्यांची उंची मोजतोय. कुठल्या पक्षातच मी जायला पाहिजे असे काही नाही. या जिल्ह्यातील सामान्य, गोरगरीब माणूस हाच माझा पक्ष आहे. हा माणूस मला बोट धरून ज्या पक्षात नेईल त्या पक्षात महाडिक जाईल. 

जिल्ह्यात कॉंग्रेसची स्थिती काय? 
महाडिक - नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील कॉंग्रेसबाबत एका दूरचित्रवाणीला सांगितले आहे. ज्यांच्या इशाऱ्यावर कोकणचे राजकारण चालते, त्या श्री. राणे यांनी महाडिक नसल्यानेच कॉंग्रेसची कोल्हापुरात वाताहात झाल्याचे सांगितले आहे. मग मी आणि या पक्षाबद्दल कशाला काय बोलू? 

गगनबावड्यात फारच लक्ष का घातले? 
महाडिक - मला लोक किंमत फार देतात, त्यांच्या जोरावरच मी परिवर्तन घडवतो. गगनबावडा तालुक्‍यातील लोकांची अवस्था दयनीय आहे. त्यांची अवस्था पाहून वेदना झाल्या, या तालुक्‍यातील सामान्यांसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे, त्यासाठीच या तालुक्‍याला ताकद मिळावी म्हणूनच जास्त लक्ष घातले आहे. कोणालाही न दुखावता हे काम मी करणार आहे. 
 

Web Title: district politics without me impossible : Mahadev mahadik