माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील साक्षी डुचाळला 99. 40 टक्के गुण

किरण चव्हाण
शुक्रवार, 8 जून 2018

माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील साक्षी डुचाळ या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 99. 40 टक्के गुण मिळवले असून, प्रशालेतील 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. 

माढा (सोलापूर) : माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील साक्षी डुचाळ या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 99. 40 टक्के गुण मिळवले असून, प्रशालेतील 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. 

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणात्मक दर्जावर सध्या अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. सोलापूर जिल्हा परिषदेची जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या निकालाने या प्रश्नाला एकाप्रकारे उत्तरच दिले आहे. प्रशालेतील साक्षी डुचाऴ या मुलीने 99.40 टक्के गुण मिळवले आहे. शिवाय समृध्दी नागटिळकला 97 टक्के, तेजस्वी जाधवला 96.20, सुप्रिया मानेला 96 टक्के, सुकन्या ओहाळला 95.20 टक्के, किशोरी चव्हाणला 94 टक्के, ऐश्वर्या राऊतसा 90.60 टक्के गुण मिळाले आहेत.

प्रशालेतील 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. प्रशालेतील 57 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत 58 तर द्वितीय श्रेणीत 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावरून जिल्हा परिषद प्रशालेचे गुणात्मक वाढ दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांची हेटाळणी करण्याचे प्रयत्न अनेकवेळा होताना दिसून येतात. मात्र माढ्यातील जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या निकालाने अशी हेटाळणी करणाऱ्यांना जोरदार चपराक दिली आहे.

गुणात्मक पातळीबरोबरच या प्रशालेचा खेळातील आलेखही अतिशय चांगला असून विविध खेळात प्रशालेतील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या शाळा हा चेष्टेचा नव्हे तर गुणवत्तेचा विषय बनल्याचे या निकालवरून दिसून येते. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या झपाटयाने गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करती असल्याचे चित्र सध्या आहे. 

विशेष म्हणजे या प्रशालेतील शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालीत नावे समाविष्ट नसल्याने ही प्रणाली बंद असल्याने मागील आठ महिन्यांपासून झाले नव्हते. दोन-तीन दिवसांपूर्वीच केवळ चार महिन्यांचा पगार झाला.

एकंदरीतच शिक्षकांच्या गलेलठ्ठ पगारावर टीकाटिपण्णी करणाऱ्यांचेही कान या निकालामुळे पिळले आहेत. प्रशालेतील शिक्षकांनी पगार नसतानाही मुलांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष केले नसल्याचे दिसत आहे. अर्थात अनेक ठिकाणी विनाअनुदान तत्वावर शिक्षक पगाराविनाच शिकवत असले तरी पगाराची सवय झालेल्यांनी पगारशिवाय आठ महिने काढले आहेत.

Web Title: District School of Zilla Parishad school student sakshi duchal got 99 percentage