जिल्हा विकास आघाडीसाठी मोर्चेबांधणी

उमेश बांबरे
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

उदयनराजे जुन्या- नव्यांची मोट बांधण्याच्या तयारीत; ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी

उदयनराजे जुन्या- नव्यांची मोट बांधण्याच्या तयारीत; ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी
सातारा - नगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन गट, गणनिहाय मेळाव्यांचा सपाटा सुरू केला आहे, तर खासदारांनी जिल्हा परिषदेसाठी जुन्या- नव्यांची मोट बांधत जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदारांच्या या छुप्या अजेंड्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत. 

नगरपालिका निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपने १८ नगरसेवकांच्या जागा जिंकत दोन नगराध्यक्षपदे मिळवत खिंडार पाडले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झालेल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघांत गट, गणनिहाय मेळावे घेऊन त्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. सातारा पालिका निवडणुकीतील अपयशानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे झपाटून कामाला लागले आहेत. येथे त्यांना खासदार उदयनराजेंकडून धोका होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी कोरेगाव, वाई, कऱ्हाड उत्तरमधील ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांची मदत घेतली आहे. या मेळाव्यांना मात्र, खासदार उदयनराजेंच्या समर्थकांना पूर्णपणे बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. या सर्व परिस्थितीमुळे खासदार समर्थकांत संभ्रमाचे वातावरण आहे. आम्हाला डावलून राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे आमदार मेळावे घेत असतील, तर आम्हीही स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी करू, अशा तयारीत खासदार समर्थक आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले सध्या पुणे मुक्कामी असून, त्यांनी अद्याप साताऱ्यात लक्ष घातलेले नाही. पालिका निवडणुकीनंतर त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील जुन्या- नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यातून जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.

त्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे खासदारांच्या जिल्हा विकास आघाडीची सध्यातरी जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. ही विकास आघाडी आगामी काळात ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला धक्का देणारी ठरू शकते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या या धुसफुशीचा फायदा भारतीय जनता पक्ष उठवू शकतो. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या जिल्ह्यातील आमदारांना खासदार उदयनराजेंबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या हालचालींवर नजर ठेवावी लागणार आहे. अन्यथा जिल्हा परिषदेची ही निवडणूक ‘राष्ट्रवादी’ला जड जाण्याची शक्‍यता आहे.

खासदारांच्या उमेदवारांची उत्सुकता 
‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनी गट, गणनिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून  मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मेळाव्यांना खासदार समर्थक कार्यकर्त्यांना पूर्ण बाजूला ठेवले आहे. त्यामुळे खासदार समर्थकांत अस्वस्थता वाढली आहे. अशातच आमदार समर्थकांतच उमेदवारीवरून रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे खासदारांकडून उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे.

Web Title: district vikas aghadi planning