जिल्हा बॅंकांना नाबार्ड देणार लागेल तेवढे पैसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - देशभरातील जिल्हा बॅंकांना नोटाबंदीमुळे भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी "नाबार्ड' सरसावले आहे. नाबार्ड व रिझर्व्ह बॅंकेत एक समझोता झाला आहे. यापुढे जिल्हा बॅंकांनी त्यांचे प्रश्‍न नाबार्डकडे मांडायचे व तेथून ते रिझर्व्ह बॅंकेला पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी नाबार्डने उचलली आहे. या निर्णयाने जिल्हा बॅंकांना कर्जासाठी लागेल तेवढा निधी मिळण्याबरोबरच दैनंदिन व्यवहारासाठी जेवढी रक्कम लागेल, तीही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चलनातून 500 व 1000च्या नोटा रद्द केल्यानंतर त्या स्वीकारण्याचे अधिकार सुरवातीला सर्व जिल्हा बॅंकांना दिले होते; पण जिल्हा बॅंकांत इतर बॅंकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा स्वीकारल्या गेल्या. यावरून रिझर्व्ह बॅंकेला संशय आल्याने जिल्हा बॅंकांनाही या नोटा स्वीकारण्यावर निर्बंध घातले. या निर्णयाने देशभरातील जिल्हा बॅंकांत गोंधळ सुरू असताना अर्थमंत्री अरुण जेटलींसह रिझर्व्ह बॅंक या निर्णयावर ठाम राहिल्याने जिल्हा बॅंकांसमोरील अडचणीत भर पडली.

जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी परवानगी राहू दे, निदान रोजच्या व्यवहारासाठी तरी लागेल तेवढे पैसे राष्ट्रीयीकृत बॅंकांतून मिळावेत, अशी जिल्हा बॅंकांची मागणी होती; पण चलन तुटवड्यामुळे बॅंकांना मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प होऊ लागल्याने ग्रामीण अर्थकारण पूर्ण ठप्प झाले आहे. दूध, ऊस उत्पादकांबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यावर असलेले पैसेही देण्यात अडचणी निर्माण झाल्या. यासंदर्भात सर्व बॅंकांनी त्यांची शिखर संस्था असलेल्या नाबार्डकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नाबार्ड व रिझर्व्ह बॅंकेत जिल्हा बॅंकांसाठी एक समझोता झाला आहे.

या समझोत्यानुसार देशभरातील जिल्हा बॅंकांनी आपल्याला कर्ज वितरणांसह दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी रक्कम नाबार्डकडे रितसर मागणी करायची. नाबार्डकडून तेवढ्या रकमेची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे केली जाईल व रिझर्व्ह बॅंकेकडून ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर नाबार्डमार्फतच ती संबंधित जिल्हा बॅंकांना यापुढे मिळणार आहे. या निर्णयाने जिल्हा बॅंकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

21 हजार कोटी मिळाले
देशभरातील जिल्हा बॅंकांसाठी आज 21 हजार कोटी रुपये नाबार्डकडून प्राप्त झाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील कर्जासाठी वितरीत केली जाणार आहे. दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी रक्कमही अशाच पद्धतीने मिळणार आहे. आज कोल्हापूर जिल्हा बॅंकेला त्यांच्या व्यवहारासाठी 6 कोटी 32 लाख रुपयांची रक्कम मिळाली. गेल्या आठ-दहा दिवसांपासून एक ते दीड कोटी एवढीच रक्कम मिळत होती. नोटाबंदीनंतर आज पहिल्यांदा कोल्हापूर जिल्हा बॅंकेला एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली आहे.

Web Title: The district will give banks more money from NABARD