सातारा जिल्हा रुग्णालयात कामाचा बोजवारा ; अधिकारी पुण्याच्या वारीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या पाच दिवस आठवड्याचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही.

सातारा : जिल्हा रुग्णालयामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदावर पुणेकरांची वर्णी असून, ते दर आठवड्याला शनिवार व रविवारी घरी जात असल्यामुळे स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे. त्याचा परिणाम एकंदर कार्यक्षमतेवर होऊन रुग्णालयाच्या कारभाराचा बोजवार उडताना दिसत आहे. त्याला लगाम कोण लावणार, हा प्रश्‍न आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे एक-एक सुरस कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. त्यामध्ये बाहेरून जिल्ह्यात सेवेला आलेले वैद्यकीय अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची अजब पद्धतीची आणखी भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांची 54 पदे मंजूर आहेत. परंतु, नव्याने भरती न झाल्याने यातील अनेक पदे रिक्त होती. त्यामुळे सहाजिकच रुग्णालयाच्या स्वच्छतेवर परिणाम होत होता. रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कंत्राटी तत्त्वावर पदे भरली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेत चांगलीच सुधारणा झाली होती. परंतु, त्यांच्यानंतर ही पदे कमी करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर पुन्हा परिणाम होऊ लागला. 

त्यानंतर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सुमारे 25 पदे पुण्यावरून बदलीने भरण्यात आली. परंतु, त्यांच्याकडे योग्य पद्धतीने काम करून घेण्याचे काम रुग्णालय प्रशासनाकडे होत नाही. या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण दोन-तीन महिने गैरहजर असतात. न सांगताच अनेक दांड्या मारत असतात. त्याचबरोबर शनिवार व रविवार हे तर त्यांना त्यांच्या हक्काचेच दिवस वाटू लागले आहेत. वरिष्ठांना न सांगताच ते या दिवशी दांडी मारत असतात. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेची व्यवस्था ठेवायची कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच काहींना टोकायचे म्हटले तर, शनिवार व रविवार सुट्या घेणाऱ्या वरिष्ठांकडेच ते बोट दाखतात. वरिष्ठांकडून त्यांच्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने काम होत नाही. परिणामी रुग्णालयात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. 

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व एनएचआरएमचे तज्ज्ञांनाही पाच दिवसांचाच आठवडा वाटत आहे. प्रशासनाला कल्पना न देताच हे रजेवर असतात. त्यामुळे आठवड्याचे शेवटचे दोन दिवस जिल्हा रुग्णालयातील एकंदर कामकाज पूर्णत: विस्कळित होते. मात्र, अन्य बाबतीत नेहमी कडक भूमिका घेत असल्याचे दर्शविणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या पाच दिवस आठवड्याचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. रुग्णालयाच्या कामाचा उडत असलेला हा बोजवारा थांबविण्यासाठी दांडी बहाद्दरांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disturbance of work in satara district hospital