दिवशी घाटात ‘रामभरोसे’ प्रवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

ढेबेवाडी आणि पाटण विभाग जोडणारा दिवशी घाट सुरवातीपासूनच धोकादायक स्थितीमुळे चर्चेत आहे. वन आणि बांधकाम विभागाच्या वादामुळे रस्ता रुंदीकरणावर आलेल्या मर्यादा, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी सुटलेल्या दरडी, सुरक्षा कठडे आणि सूचना फलकांचा अभाव आदी बाबींमुळे या घाटातून प्रवासी आणि वाहनचालकांची जीव मुठीत धरून ये-जा सुरू असतानाही पूर्वीपासूनच बांधकाम विभाग या समस्यांकडे फारशा गांभीर्याने पाहताना दिसत नाही.

ढेबेवाडी - दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असलेला आणि ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा दिवशी घाट सध्या तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे अत्यंत धोकादायक बनला असून, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा सुरू आहे.

ढेबेवाडी आणि पाटण विभाग जोडणारा दिवशी घाट सुरवातीपासूनच धोकादायक स्थितीमुळे चर्चेत आहे. वन आणि बांधकाम विभागाच्या वादामुळे रस्ता रुंदीकरणावर आलेल्या मर्यादा, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी सुटलेल्या दरडी, सुरक्षा कठडे आणि सूचना फलकांचा अभाव आदी बाबींमुळे या घाटातून प्रवासी आणि वाहनचालकांची जीव मुठीत धरून ये-जा सुरू असतानाही पूर्वीपासूनच बांधकाम विभाग या समस्यांकडे फारशा गांभीर्याने पाहताना दिसत नाही. आतापर्यंत घाटात अनेकदा अपघात झाले असून, काहीजणांनी त्यात जीवही गमावला आहे. रस्त्याशेजारच्या सुटलेल्या दरडी पावसाळ्यात कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत असले तरी अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग हा धोका पूर्णपणे हटवू शकलेले नाही. आजही अनेक ठिकाणच्या दरडी सुटलेल्या स्थितीत रस्त्याच्या बाजूला लोंबकळत आहेत. वनहद्दीत दरडी आणि बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्ता अशीच काहीशी विचित्र परिस्थिती येथे दिसून येत आहे. 

साइडपट्ट्यांच्या बाजूने ठिकठिकाणी रस्ता खोदल्याने अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर समोरून वाहन आल्यावर मोठी पंचाईत होत आहे.

दिवशी गावादरम्यान एका ठिकाणी रस्ता खोदल्याने तिथे तर जीवघेणी कसरत सुरू आहे. वाहनांना ये- जा करण्यासाठी दरडीच्या बाजूने आता रस्ता सुरू ठेवला असला तरी त्याला लागूनच मोठा खंदक खोदल्यासारखी स्थिती असल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक जीव मुठीत धरूनच ये-जा करताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत घाटातून वाहनांची ये-जा सुरू असते. काही वाहनचालक नवखे असल्याने त्यांची त्याठिकाणी फसगत होत आहे.

सध्याच्या तेथील कामाचा वेग आणि उपलब्ध यंत्रणा पाहता बांधकामाचा उरक नेमका कधी होईल आणि कधी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल, हे सांगणे तसे कठीणच दिसत आहे.

वरिष्ठांकडून तपासणीची गरज
ढेबेवाडी ते नवारस्ता रस्ता निकृष्ट आणि बेजबाबदारपणे केलेल्या बांधकामामुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी याप्रश्नी महामोर्चाचा इशाराही संबंधितांना दिला होता. या पार्श्वभूमीवर सध्या घाटात सुरू असलेल्या कामांची आणि निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीची बांधकाम विभागाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात. सुरू असलेले बांधकाम दर्जेदार आहे का, पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध आहे का आणि सुरक्षेसाठी आवश्‍यक ती सर्व काळजी घेतली आहे का, याची तपासणी करावी, अशीही मागणी होत आहे.

Web Title: Divashi Ghat Dangerous Journey