ते आले, त्यांनी पाहिले आणि सूचना देऊन गेले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

कोल्हापूर - ते आले, त्यांनी पाहिलं आणि सूचना देऊन निघून गेले, या पारंपरिक विभागीय क्रीडा संकुलाच्या नाट्य प्रयोगाला आता ब्रेक मिळणार का, असा प्रश्‍न क्रीडाप्रेमींतून आज उपस्थित झाला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी क्रीडा संकुलातील अपुऱ्या कामांबाबत क्रीडाधिकाऱ्यांना शाब्दिक डोस जरूर दिला. मात्र, संकुलाचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कामाला लागणार का? असा प्रश्‍न क्रीडाप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.

डॉ. म्हैसेकर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळीच त्यांनी क्रीडा संकुलाला भेट देऊन तेथील अपुऱ्या कामांचा आढावा घेतला. सुरुवातीला ते टेनिस कोर्टवर गेले. पाणी कनेक्‍शन नसल्याने त्यांनी तेथेच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. संकुलातील मैदानावर वाढलेले गवत आणि चिखल पाहून क्रीडाधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. त्यानंतर जलतरण तलावाची पाहणी करत संभाजीनगरमधून येणाऱ्या सांडपाण्याची माहिती घेतली. क्रीडाधिकारी बाजीराव देसाई यांनी तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याची निर्गत करण्यासाठी तलावाच्या बाजूला विहीर बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. थेट तलावात मिसळणारे पाणी विहिरीत साठले जाईल आणि त्याचा परिणाम तलावातील पाण्यावर होणार नाही, असेही त्यानी सांगितले.

सार्वजनिक बांधकामच्या अभियंत्यांनी त्यांना संकुलाचा आराखडा दाखविला. आर्किटेक्‍ट मुकुल पारेख यांनी त्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तलावाच्या बाजूने काढण्यात आलेल्या गटारीसंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर शूटिंग रेंजवरील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. रेंजवर वाढलेले गवत व काही ठिकाणी फळ्या नसल्याचे पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. श्री. देसाई यांनी चार वर्षांपूर्वीच रेंजचे काम झाले आहे. किरकोळ काम बाकी असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही, असे स्पष्टीकरण दिले. 

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, जिल्हा जलतरण संघटनेचे आनंद माने, सुजय पित्रे, दिग्विजय मळगे, अजय पाठक उपस्थित होते.

तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र ती केवळ कागदोपत्रीच ठरली. संकुलाची पाहणी आणि सूचनांची यादी यांचे समीकरण तयार झाले आहे. संकुल पूर्णत्वास कधी येणार, याचे उत्तर का मिळत नाही? म्हैसेकर यांची भेट फार्स न ठरावी, हीच अपेक्षा आहे.
- अशोक पोवार

Web Title: Divisional Commissioner visited the sports complex