दिवाळीच्या अंघोळीला टॅंकरचे पाणी!

पाचवड - ऐन दिवाळीत ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाचवड - ऐन दिवाळीत ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

कलेढोण - खर्डा आंदोलन, रास्ता रोको, रक्तरंजित निवेदने, कुसळांची भेट, काळी दिवाळी आदींद्वारे खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, ही मागणी जोर धरत असतानाच खटावच्या पाचवड, कठरेवाडी, मांडवे, आवळेपठार येथे टॅंकरने तर डिस्कळ, मुळीकवाडी, गारुडी, खटाव, रेवलकरवाडीला अधिग्रहणाच्या ठिकाणाहून पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन दिवाळीत टॅंकरच्या पाण्याने कराव्या लागणाऱ्या अंघोळीने साहेब, आम्ही कुठे दुष्काळी? असा उपरोधिक प्रश्न जनता प्रशासनाला विचारीत आहे.

तालुक्‍यात समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील गावोगावच्या ग्रामपंचायती तालुका पाणीपुरवठा विभागाकडे टॅंकर व विहीर, बोअर अधिग्रहणाची मागणी करीत आहेत. त्यात खटावच्या पूर्व भागाचा अधिक समावेश आहे. आजअखेर तालुक्‍यात पाचवड व कठरेवाडी (तीन खेपा), मांडवे (एक खेप), आवळेपठार (एक खेप) अशा खेपांद्वारे पाणीपुरवठा होत असून, याच गावातून टॅंकरच्या वाढीव खेपांचे प्रस्ताव विभागाकडे दाखल झाले आहेत. तर डिस्कळ, मुळीकवाडी, गारुडी, खटाव, रेवलकरवाडी येथे अधिग्रहण केलेल्या विहिरी व बोअर या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत आहे. खालावलेल्या पाणी पातळीमुळे मोळ, मांजरवाडी, गारुडी या गावांचे टॅंकरमागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील मोळ, मांजरवाडीत टॅंकर मंजूर झाले असून, येत्या सोमवारपासून या गावांना पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. नजीकच्या काळात तालुक्‍यात पाणीटंचाई वाढून जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागणार आहे. खटावच्या पूर्व भागातील मायणी, कानकात्रे, कटकाळी, तरसवाडी घाटातील तलाव कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. कलेढोणला पाणीपुरवठा करणारी विहीर शेवटची घटका मोजत असून, कटकाळी तलाव कोरडा असल्याने ग्रामपंचायतीला टॅंकर मागणी करावी लागणार आहे. तालुका पाणीपुरवठा विभागाकडे दिवसेंदिवस वाढणाऱ्या टॅंकरच्या मागणीमुळे तालुक्‍यावर पाण्यासाठी आणीबाणीची वेळ ठेपली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com