अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुलला "दिवाळी 'चा आनंद ; रयत, जे.एम.फाऊंडेशनकडून लाखांचे गिप्ट

दिलीपकुमार चिंचकर
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील मुलांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी मुलांना नुकतीच मदत करण्यात आली.
 

सातारा : ती सारी मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची. वडिलांच्या जाण्याने पोरकी झालेली. साताऱ्यात कर्मवीरांच्या "रयत'ने त्यांना जगण्याचं, शिक्षणाचं बळ दिलं. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला दिवाळी साजरी करता यावी, यासाठी नव्या कपड्यांसह साहित्य आणि शिधा रयत शिक्षण संस्था आणि मुंबईच्या जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनने या मुलांना दिले. नवी कपडे अन्‌ साहित्य पाहताच या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर "दिवाळी'चा आनंद फुलला.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी अशा कुटुंबातील मुलांना रयत शिक्षण संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यांच्या शिक्षणाची अन्‌ स्वावलंबनाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील ही 37 मुले आणि 23 मुली येथील धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगमध्ये राहून "रयत'मध्ये आनंदाने शिक्षण घेत आहेत. संस्था त्यांना एक रुपायाचाही खर्च येऊ देत नाही. ही मुले सुटीत गावी जातात. मात्र, घरी कष्ट करून जगणारी एकटी आई किंवा आजी, आजोबाच असतात. सर्वांचीच परिस्थिती तशी बिकट. त्यामुळे या कुटुंबालाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी मुलांना नुकतीच मदत करण्यात आली.

रयत शिक्षण संस्था आणि जे. एम. फाउंडेशनच्या पूजा दवे, सुनील कराळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 2000 रुपयांचे असे एकूण एक लाख 34 हजार रुपयांचे साहित्य दिले. त्यामध्ये मुलांना दोन ड्रेस, तेल, साबण, उटणे तसेच कुटुंबासाठी बुंदीचे लाडू, चिवडा आणि कुटुंबाकरिता रवा, बेसन, डालडा, मैदा, साखर असा शिधाही दिला.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल पाटील, डॉ.भारती पाटील यांच्या हस्ते हे साहित्य मुलांना नुकतेच देण्यात आले. त्यावेळी प्राचार्य शहाजी डोंगरे, संस्थेचे इतर पदाधिकारी, अधीक्षक प्रशांत गुजरे, सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहाच्या अधिक्षिका एस. एस. शिंदे उपस्थित होत्या. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ""आत्महत्याग्रस्त मुलांची काळजी आम्ही घेत आहोत. मुलांबरोबरच त्यांच्या कुटुंबालाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, 
यासाठीच त्यांना ही मदत करण्यात येत आहे. त्यासाठी जे. एम. फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.''स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali blossoms in the faces of orphan children Rayat G M Foundation gifted gifts